नवी दिल्ली – वारंवार धोक्याची सूचना देऊनही रेल्वेच्या टपावर उभं राहून सेल्फी घेण्याचं वेड काही कमी होताना दिसत नाही. असाच एक प्रकार ओडिशातील गजपती जिल्ह्यात घडला. टपावर उभं राहून सेल्फी घेताना वीजेच्या उघड्या तारेशी संपर्क आल्याने एका १३ वर्षीय मुलाला जीव गमवावा लागला. तर त्याचे दोन मित्र जखमी झाले. पी. सूर्या असे या जीव गमावलेल्या मुलाचे नाव आहे.
या जिल्ह्यात रेल्वेच्या एका डब्याला आयसोलेशन युनिट बनवण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशातील परलाखेमुंडी या स्थानकावर हे आयसोलेशन युनिट आहे. पी. सूर्या आणि त्याचे दोन मित्र त्या डब्याच्या टपावर चढून सेल्फी घेत होते. तेंव्हाच उघड्या तारेशी संपर्क येऊन सूर्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचे मित्र जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकारामुळे त्या डब्याच्या छताच्या कार्पेटला देखील आग लागली. पण याचा कोणताही त्रास आयसोलेशन कोचला झाला नाही. हा डबा मुख्य स्टेशनपासून १०० मी.च्या अंतरावर आहे. त्यामुळे स्टेशनला देखील कसलीही झळ बसली नाही.