मध्य रेल्वेच्या आरपीएफ टीमचे तिकीट दलालांच्या विरोधात तीव्र मोहीम
मुंबई – एकापेक्षा जास्त वैयक्तिक आयडी वापरुन ई-तिकिटांचा काळाबाजार करण्याच्या आणि विशेष गाड्यांमध्ये आरक्षित आसने अडवून ठेवण्याच्या तक्रारी आल्यामुळे मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) अशा तिकीट दलालाविरूद्ध मोहीम अधिक तीव्र केली आहे. आरपीएफच्या पथकाने सायबर सेल आणि इतर इंटेलिजेंस इनपुटमधून प्राप्त केलेल्या माहितीच्या आधारे छापेमारीही केली. मध्य रेल्वेच्या पाचही विभागांवर हे छापे टाकण्यात आले.
मध्य रेल्वेच्या, रेल्वे सुरक्षा दलाने वर्ष २०२० दरम्यान, रेल्वे कायद्याच्या तरतुदींनुसार ४६६ गुन्हे दाखल केले आहेत. या छापेमारी दरम्यान रु. २.७८ कोटी किमतीच्या एकूण १४,३४३ तिकिटे जप्त केली ज्यात १४,०६५ ई-तिकिटे आणि २७८ काऊंटर तिकिटांचा समावेश आहे आणि ४९२ जणांना अटक करण्यात आली.
मध्य रेल्वेवर नोंदविण्यात आलेल्या या ४६६ प्रकरणांपैकी २५३ गुन्हे हे मुंबई विभागात दाखल झालेली असून रु. १.४३ कोटी किमतीची ७,००२ तिकिटे जप्त करण्यात आली ज्यात ६,८६३ ई-तिकिटे आणि १३९ काउंटर तिकिटांचा समावेश आहे आणि एकूण २६२ जणांना अटक करण्यात आली.
प्रामाणिक प्रवाशांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि स्क्रिप्टिंग सॉफ्टवेअरच्या वापरासह अनैतिक घटकांच्या अनधिकृत तिकीट विक्रीच्या घटना रोखण्यासाठी ही तपासणी अधिक तीव्र केली आहे. रेल्वे तिकिटे अनधिकृतपणे खरेदी व पुरवठा करण्याचा धंदा करणे, रेल्वे अधिनियमातील तरतुदीनुसार दंडनीय अपराध आहे. अशा अवैध कामात गुंतलेल्या व्यक्तींना रेल्वे कायद्यात अस्तित्त्वात असलेल्या कायदेशीर तरतुदीनुसार शिक्षा दिली जाते असेही आरपीएफने सांगितले आहे.