मुंबई – रेल्वेच्या प्रवासात कुणावरही कुठल्याच समस्येचा सामना करण्याची वेळ येऊ नये. पण अडचण आलीच तर आता चिंता करण्याची गरज नाही. कारण रेल्वे प्रवाश्यांसाठी एक उत्तम बातमी आली आहे. पहिले रेल्वेचे वेगवेगळ्या सेवांसाठी वेगवेगळे नंबर्स होते. मात्र त्यामुळे त्रास व्हायचा. आता रेल्वेने आपला हेल्पलाईन नंबर १३९ लाच एकीकृत हेल्पलाईन नंबर म्हणून बदल केला आहे.
१ एप्रिलपासून ही सुविधा लागू होणार आहे. याची माहिती रेल्वेने आपल्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवरून दिली आहे. अर्थात त्यासंदर्भात जनजागृतीची मोहिमच रेल्वेने सुरू केली आहे. धनबाद आरपीएफने आपल्या ट्वीटर हँडलवरून ही माहिती दिली.
पूर्व मध्य रेल्वे आणि पूर्व रेल्वेनेही अश्याच पोस्ट ट्वीटरद्वारे केल्या आहेत. रेल्वेचा एकीकृत हेल्पलाईन नंबर १३९ वर प्रवासी कॉल करू शकतील किंवा एसएमएसही करू शकतील. यात मेडिकल इमर्जन्सी आणि सुरक्षा, चौकशी, कॅटरिंग, तक्रार, सतर्कता, अपघाताची सूचना, तक्रारीचे स्टेटस आणि कॉल सेंटर अधिकारी यांच्याशी संवाद या सेवा उपलब्ध असतील.
१२ भाषांमध्ये सुविधा
भारतीय रेल्वेने १३९ या एकीकृत हेल्पलाईन क्रमांकावर १२ भाषांमध्ये सेवा उपलब्ध करून दिली आहे. प्रवासी आपल्या सोयीनुसार भाषा निवडू शकणार आहेत. हा हेल्पलाईन क्रमांक इंटरअॅक्टीव्ह व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टीम (आयव्हीआरएस)वर आधारित आहे.
भाषा निवडल्यानंतर आणि सुविधा निश्चित झाल्यानंतर आयव्हीआरएसच्या दिशा–निर्देशांनुसार नंबरचे बटण दाबावे लागेल.