बुलडाणा – कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा जिल्ह्यात पर्याप्त ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. याबाबत कंपन्यांशी चर्चा करून उत्पादनही वाढवायला लावले आहे. त्यामुळे या औषधाचा मागणीनुसार पुरवठा करणे शक्य होणार आहे. तसेच रेमडेसिवीर कंपन्यांशी चर्चा करून या औषधाचे दर नियंत्रणात ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यातही वाढीव दराने या औषधाची विक्री होत असल्यास धाडी टाकून तपासण्या कराव्यात, अशा सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.
कोविड संसर्ग नियंत्रणाबाबत पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी एस.रामामूर्ती, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नितीन तडस, अपर जिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कांबळे, सहायक आयुक्त (औषधे) अशोक बर्डे, औषध निरीक्षक गजानन घिरके आदी उपस्थित होते.
रेमडेसिवीर औषधाची एमआरपी कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे सांगत पालकमंत्री डॉ.शिंगणे म्हणाले, औषधाची एमआरपी कमी करण्याचा अधिकार केंद्र शासनाला आहे. त्यानुसार एमआरपी कमी करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. कोरोनाची तपासणी बऱ्यापैकी होत आहे. त्यामुळे रूग्णसंख्या वाढत आहे. कोविडवर लसीकरण अत्यंत प्रभावी असून लसीकरणाचा वेग वाढविला पाहिजे. राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेतील सर्वांचे लसीकरण करून घ्यावे. लसीकरणाचा वेग बघता लसींचा पर्याप्त साठा ठेवावा. त्यानुसार विभागाने नियोजन करावे. स्त्री रूग्णालयात नवीन 100 बेडची व्यवस्था करण्यात यावी. क्षयआरोग्यधाम येथे आयसीयु युनीट तयार करावे. द्रवयुक्त ऑक्सीजनची मागणी नोंदवून परिस्थितीनुरूप द्रवयुक्त ऑक्सीजनचा साठाही पुरेसा करून ठेवावा.
यावेळी पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी कोविडचा पॉझिटीव्हीटी दर, मृत्यू दर, लसीकरणाचे प्रमाण, ऑक्सीजनचा साठा व पुरवठा, रेमडेसिवीरचा साठा व पुरवठा आदींचा आढावा घेतला. यंत्रणांकडून अडचणी जाणून घेतल्या. बैठकीला संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.