नाशिक – कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेमडीसीविर या औषधांचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू असून हे औषध आता जिल्हा सामान्य रुग्णालयासह जिल्ह्यातील पाच हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शासकीय आदेशाद्वारे कळविले आहे.
शासकीय आदेशात नमूद केल्यानुसार, कोरोना रुग्णांसाठी तातडीचे उपाय म्हणून मोठ्या प्रमाणावर रेमडीसीविर हे औषध वापरले जाते. या औषधांचा पुरवठा सर्वसामान्यांना वेळेत व्हावा या दृष्टीने जिल्हा सामान्य रुग्णालयातील फार्मसी कक्षात ५०% साठा तर उर्वरित साठ्यापैकी मनपाच्या झाकीर हुसेन रुग्णालयात आणि बिटको रुग्णालयात तसेच भौगोलिकदृष्ट्या सर्वसामान्यांना सोयीचे असेल अश्या दोन खाजगी रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. याबाबत घटना व्यवस्थापक यांच्या पातळीवर निर्णय घेण्यात येतील.
अन्न व औषध प्रशासन सहआयुक्त माधुरी पवार यांची घटना व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. या संदर्भात आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कार्यवाही करण्याचे संपूर्ण अधिकार श्रीमती पवार यांना प्रदान करण्यात येत आहेत. घटना व्यवस्थापक म्हणून कार्यरत असताना औषधांची विक्री ही शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून होत असल्याची खात्री करावी, उपलब्ध साठ्याची माहिती विक्री ठिकाणच्या दर्शनी भागात प्रदर्शित असल्याची खात्री करावी; तसेच रेमडीसीविर औषध सर्व गरजू रुग्णांना वेळेवर उपलब्ध होत असल्याची खात्री करून त्याचा दैनंदिन अहवाल विहित नमुन्यात आपत्कालीन कार्य केंद्राकडे दररोज सादर करावा. सर्व संबंधित विभागांशी समन्वय करून तात्काळ यावर उपाययोजना कराव्यात असेही आदेश जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिले आहे.