नाशिक – जिल्ह्यातील कोविड रूग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रूग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्शनची गरज भासते आहे. अशावेळी रूग्णालयांकडे असलेला साठा संपला की रूग्णालये रूग्णांच्या नातेवाईकांना ते आणण्यासाठी बाजारातील मेडिकल दुकानांवर पाठवत आहेत, त्यामुळे अशा मेडिकल दुकानांवर मोठ्या प्रमाणावर कोरोना रूग्णांच्या नातेवाईकांनी दोन दिवसांपासून गर्दी केल्याचे दिसून आले आहे, या पार्श्वभुमीवर ज्या रुग्णालयातील कोरोना रूग्णांसाठी हे इंजेक्शन हवे आहे त्या रुग्णालयाने आपल्याकडील रेमडेसिव्हिर चा साठा संपल्यानंतर त्यांचे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णासाठी विहित नमुन्यात शिफारस पत्र दिल्यानंतर या औषधाचे वितरण करण्याबातचे आदेश आज जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या सहआयुक्तांना दिले आहेत.
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी रेमडेसिव्हिरसाठी शहरातील औषध दुकांनावर होणाऱ्या गर्दीच्या ठिकाणी आज भेटी दिली व रांगेतील ग्राहकांशी चर्चाही केली. रुग्णालयाचे शिफारस पत्राच्या मुळ प्रती संबंधित औषध विक्रेत्यांनी जतन करुन ठेवणे तसेच तपासणीच्यावेळी तातडीने उपलब्ध करुन देणे आवश्यक असणार आहे. संबंधित रुग्णाचे आधारकार्ड किंवा फोटो असलेला पुरावा तसेच शासनाने वेळोवेळी निश्चित केलेले अन्य कागदपत्र उपलब्ध करुन देणे बंधनकारक असणार आहे.
औषध विक्रेत्यांनी संबंधित प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे स्कॅन करुन ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. या कार्यपद्धतीमुळे रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांना रेमडीसिविर अग्रक्रमाने उपलब्ध होईल व अनावश्यक खरेदी करण्यास आळा बसेल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.