नाशिक – निफाड येथील रेणुका मिल्कच्या दोघा संचालकांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्जावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. सी. जाधव यांच्या कोर्टात सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे त्यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. भागीदारीतील व्यवसायात थाटून पार्टनरला कोट्यवधींचा गंडा घालण्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
संदिप दत्तात्रेय आहेर (रा. पाथर्डी फाटा) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, परशराम निवृत्ती पवार (४० रा. रामपूर आंबेवाडी-नैताळे ता. निफाड) व विलास गंगाधर गुंजाळ (४० रा. जळगाव – काथरगाव ता.निफाड) अशी रेणुका मिल्कच्या संचालकांची नावे आहेत. या दोघांनी फसवणूक केल्याचा आरोप आहे. मिल्क ट्रेंडिग व्यावसायिक आहेर यांची दूध संघाच्या माध्यमातून २०११ मध्ये विलास गुंजाळ यांच्याशी मैत्री झाली होती. यावेळी जोडधंद्याच्या संकल्पनेतून रेणुका मिल्क प्लॅन्टची स्थापना करण्यात आली. आहेर यांनी गुंतवणुकीची हमी घेतल्याने ८० टक्के त्यांचा तर दोघा भागीदारांना प्रत्येकी दहा टक्के हिस्सा देण्याचे ठरले. त्यानंतर २०१२ मध्ये भागीदारी पत्रात बदल करण्यात आले.या भागीदारीत ४० टक्के आहेर यांना तर प्रत्येकी दोघांना ३० टक्के हिस्सा देण्याचे ठरले. यानंतर या व्यवसायासाठी संशयित परशराम पवार यांच्या पत्नीच्या नावे रामपूर ता. निफाड येथे जमीन खरेदी करण्यात आली. या ठिकाणी मिल्क प्लॅन्ट सुरू करण्यासाठी आहेर यांनी सिडकोतील महानगर बँक तसेच राजाराम वराळ आणि बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून लाखोंची रोकड उभी केली. त्याबरोबरच खेळत्या भांडवलासाठी सदर प्लॅन्टवर दीड कोटींचे कर्ज काढण्यात आले.
दोघा संशयितांकडे हा व्यवसाय सांभाळण्याची जबाबदारी असल्याने त्यांनी अल्पावधीतच तोटा झाल्याचे भासवून गैरव्यवहार केला. ही बाब लक्षात आल्याने आहेर यांनी दफ्तर तपासणी केली असता संशयितांनी १ कोटी ६५ लाख ५ हजार १८७ रूपयांचा गैरव्यवहार करून जमिनी घेतल्याचे पुढे आले. संशयितांची कानउघडणी करताच त्यांनी अपहार केल्याचा लेखी कबुली जबाब दिला. तसेच वराळ आणि थोरात यांच्याकडून घेतलेल्या हात उसनवारीच्या रकमा आम्ही परत करू असे आश्वासनही दिले. यानंतर संबधितांनी मोठ्या रकमांची सहा महिन्यात परतफेड करणे शक्य नसल्याचे सांगून हा प्लॅन्ट आम्हाला विकत द्या. त्याच्यावर कर्ज काढून तुमच्यासह हात ऊसनवार घेतलेले पैसे परत करण्याची ग्वाही दिली. त्यानुसार ३ जून २०१६ रोजी नव्याने भागीदार संस्थेत आपले नातेवाईक नवीन सदस्य म्हणून घेतले. या काळात संस्थेच्या गैरव्यवहारास आहेर जबाबदार असल्याचे भासवून संशयितांनी नातेवाईकांना कायदेशीर नोटिसा पाठविण्यास भाग पाडले. यानंतर मात्र संशयितांनी गुंतवणुकीची रक्कम अदा करण्यास टाळाटाळ केली असून संशयितांकडून जीवे ठार मारण्याची धमकी दिली जात आहे.
याबाबत आहेर यांनी न्यायालयात दाद मागितल्याने हा गुन्हा सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. संशयितांनी अटक टाळण्यासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने दोघा संचालकांचा अटकपूर्व अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आता त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.