नाशिक – ‘कोविडच्या अभूतपूर्व संकटाने समस्त मानवास उत्तम आरोग्याचे मोल जाणवले. सुदैवाने नव्याने लागण होणाऱ्या रुग्णाच्या रुग्णांच्या संख्येमध्ये घट आणि लसीची उपलब्धता यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. तरीही उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर आहे हे नाकारून चालणार नाही. या पार्श्वभूमीवर रेडक्रॉस येथे डॉ. सुषमा भुतडा यांच्या पुढाकाराने सुरू होत असलेली साप्ताहिक स्त्री रुग्ण तपासणी सुविधा सामान्य रुग्णांसाठी अतिशय उपयोगी ठरेल. गरजुंनी या सेवेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा’, असे आवाहन रेडक्रॉस चे सचिव मेजर पी एम भगत यांनी केले.
नाशिक रेडक्रॉस आयोजित मोफत स्त्रीरुग्ण तपासणी कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ आणि अनुभवी स्त्री रोग तज्ञ डॉ. सुषमा भुतडा, रेडक्रॉस च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा औंधकर उपस्थित होत्या. दरम्यान, डॉ. भुतडा दर बुधवारी सकाळी दहा ते अकरा या वेळेत रेडक्रॉस, टिळक पथ येथे रुग्णांची मोफत तपासणी करणार असून रुग्णांनी आधी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी शशी शर्मा यांच्याशी 9373909477 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन नाशिक रेड क्रॉसने केले आहे.