रामनगर – देशातील काही राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. आता काही राज्यात रोज दोनशेहून अधिक प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. अशा परिस्थितीत कोरोना बाधित राज्यांमधून उत्तराखंडात येणाऱ्या पर्यटकांसाठी कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य करण्यात आला आहे. याचा परिणाम पर्यटन व्यवसायावरही दिसू लागला आहे.
एकीकडे हॉटेल आणि रिसॉर्ट्समध्ये बुकिंग रद्द होऊ लागले आहे. त्यातच पर्यटकांच्या संख्येतही घट झाली आहे. मागील वर्षीही पर्यटन हंगाम सुरू होताना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. उत्तराखंड सरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचनानुसार, इतर राज्यांमधून येणार्या लोकांना कोरोनाचा ७२ तास आधीचा निगेटिव्ह तपासणी अहवाल आणावा लागत आहे.
कॉर्बेट प्रशासनाने त्यांच्या दिवसा सफारी आणि रात्री मुक्काम करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना हा अहवाल अनिवार्य केला आहे. ज्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह असेल. केवळ त्याच पर्यटकांना कॉर्बेट पार्कमध्ये सफारी करता येणार आहे. तसेच येथील कर्मचार्यांनी निर्देशित केले आहे की, पर्यटकांनी मास्क आणि सेनिटायझर्स वापरणे आवश्यक आहे.
दरम्यान, कोरोना बाबतच्या मार्गदर्शक सूचना नैनीतालमध्ये लागू केल्या गेल्या आहे. शहरातील प्रवेश द्वारावर चाचणी अहवाल आणि थर्मल स्क्रिनिंग दर्शवल्यानंतरच पर्यटकांना शहरात प्रवेश मिळू शकेल. प्रवेशद्वारांवर पर्यटकांची एच्छिक कोरोना तपासणीही केली जाईल.
कोरोना प्रतिबंधासंदर्भात सरकारने एक सल्लागार जारी केला असून, १२ राज्यातून आलेल्या पर्यटकांना आरटीपीसीआर तपासणी करणे अनिवार्य केले आहे. वाढता धोका लक्षात घेता आता जिल्हा प्रशासन आणि रुग्णालय व्यवस्थापनानेही संसर्ग रोखण्यासाठी तयारी सुरू केली आहे.