नवी दिल्ली – शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढते आहे. लॉकडाऊनच्या काळात घातलेल्या प्रदूषणाचा दर पुन्हा वाढल्याचे दिसून येत आहे. याच धर्तीवर, रस्त्यांवर धावणाऱ्या गाड्यांद्वारे होणारे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी रिमोट सेन्सिंग प्रणाली वापरली जाणार आहे. सेन्सरच्या मदतीने वाहनांचा दर्जा, इंधनाचा प्रकार, गाडीचा वेग आदी सर्व निकष तपासले जाणार आहेत. तसेच, ज्या वाहनांतून मोठ्या प्रमाणात वायू उत्सर्जित होत असून प्रदूषण होत आहे, अशा गाडीच्या चालकांना मेसेजद्वारे सूचना देण्यात येणार आहे.
राज्य महामार्ग तसेच परिवहन मंत्रालयाने याबाबत डिसेंबरमध्ये परिपत्रक जाहीर केले आहे. याद्वारे रिमोट सेन्सिंग पद्धतीद्वारे प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. मोबाईलच्या माध्यमातून हे तंत्र वापरले जाणारे आहे. शहरातील विविध ठिकाणी हे सेन्सर लावले जाणार असून त्याद्वारे यंत्रणा राबवली जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सुरुवातीला दिल्ली येथे याबाबत चाचणी केली जाणार आहे, यशस्वी चाचणी प्राप्त झाल्यास संपूर्ण देशभरात ही यंत्रणा सुरू केली जाणार आहे. पेट्रोल, डिझेलद्वारे उत्सर्जित होणाऱ्या वायूच्या मदतीने सेन्सर काम करणार असून त्याद्वारे योग्य निकष समोर येणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. या यंत्रणेद्वारे एका वेळी ५ लाख वाहनांची नोंद ठेवणे शक्य होणार आहे. लेझरच्या मदतीने हे सेन्सर काम करणार आहेत. वेळोवेळी गोळा झालेली माहिती परिवहन मंत्रालयाच्या पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे.