मुंबई – जेनेलिया डिसुझा आणि रितेश देशमुख हे बॉलिवूडमधील एक लोकप्रिय कपल. या दोघांची जोडी प्रेक्षकांची देखील आवडती आहे. लग्नापूर्वी हिंदीसोबतच तामिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या जेनेलियाने लग्नानंतर चित्रपट क्षेत्रापासून थोडे अंतरच ठेवले. जेनेलियाचा तब्बल १० वर्षे अडकून पडलेला ‘इट्स माय लाईफ’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला. त्यानिमित्ताने तिने आपल्या करियरसंबंधी काही गोष्टी स्पष्ट केल्या.
‘पिंकव्हिला’च्या वृत्तानुसार, जेनेलिया आणि रितेश लग्न करणार असल्याचे जाहीर झाले तेंव्हा अनेकांनी तिला भेटून लग्नानंतर तुझे करियर संपुष्टात येईल असे सांगितले होते. मी तेंव्हा सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. पण माझा लग्नाचा निर्णय पक्का होता. कारण मला रितेशशी लग्न करायचेच होते. आता या क्षेत्रात खूप चांगले बदल झालेले दिसत आहेत. पूर्वीसारखं लग्न झालं म्हणजे एखाद्याचं विशेषतः अभिनेत्रींचं करियर संपलं असं आता होत नाही. हा खूप सकारात्मक बदल आहे.
१० वर्षे अडकून पडलेला ‘इट्स माय लाईफ’ हा चित्रपट मोठ्या किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवर नाही तर छोट्या पडद्यावर रिलीज झाला आहे. ‘बोम्मारिल्लू’ या तेलगू चित्रपटाचा हा रिमेक आहे.