मुंबई – भारतीय रिझर्व्ह बँकेने पेमेंट बँकांमध्ये एका ग्राहकाकडून जास्तीत जास्त रक्कम ठेवण्याची मर्यादा वाढवली असून, ती एका लाखावरून दोन लाख रुपये केली आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक (एमएसएमई) आणि लहान व्यापाऱ्यांसह ग्राहकांची गरज पूर्ण करण्यासाठी त्यांची क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने हा बदल तत्काळ लागू केला आहे.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण समितीच्या बैठकीनंतर ही घोषणा केली आहे. आतापर्यंत पेमेंट बँकांसाठी ही मर्यादा एक लाख रुपये प्रति ग्राहक इतकी होती. आरबीआयने एक निवेदन जारी करून सांगितले, की पेमेंट बँकांची आर्थिक क्षेत्रातील प्रगती आणि त्यांच्या कामांमध्ये अधिक लवचिकता आला आहे. याचा विचार करून प्रति ग्राहक जास्तीत जास्त रक्कम ठेवण्याची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पेमेंट बँकांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक क्षेत्रात त्यांचा समावेश करण्यात आला आहे. ग्राहकांच्या खात्यात रक्कम ठेवण्याची मर्यादा दुप्पट करण्याबाबतचा निर्णय पेमेंट बँकांच्या कामाचा आढावा घेऊन घेण्यात येईल, असे आरबीआयने स्पष्ट केले. त्यांना एमएसएमई, छोटे व्यापारी आणि व्यावसायिकांसह ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यात सक्षम बनवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. देशात एकूण सहा पेमेंट बँका आहेत.