नाशिक : रिक्षा प्रवासात हातोहात मोबाईल लांबविणा-या दोघा भामट्यांना पोलीसांनी जेरबंद केले असून त्यांच्या ताब्यातून आठ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. संशयीतांच्या अटकेने चोरीच्या अनेक गुह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी वर्तविली आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती शाखेने केली. भोलानाथ सिताराम साळवे (२० रा.गंजमाळ) व अभिषेक रमेश हिरे (२० रा.श्रीकृष्ण अपा.श्रमिकनगर) असे अटक करण्यात आलेल्या भामट्यांची नावे आहेत. मध्यवर्ती शाखेचे हवालदार गंगाधर केदार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. ठक्कर बाजार परिसरात रिक्षाचालकासह एक जण चोरीचा मोबाईल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.२२) वरिष्ठ निरीक्षक डॉ.सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक के.एल.सोनोने,जमादार शिरसाठ,हवालदार केदार,सोनवणे व शिपाई आजबे आदींच्या पथकाने सापळा लावला असता संशयीत पोलीसांच्या जाळ््यात अडकले. संशयीतांच्या झडतीत १३ नोव्हेंबर रोजी सातपूर गाव ते आयटीआय सिग्नल दरम्यान रिक्षा प्रवासात चोरीस गेलेला मोबाईल आढळून आला. पोलीस तपासात संशयीतांनी अनेक मोबाईल चोरल्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून आठ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. संशयीतांना सातपूर पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.