नाशिक : रिक्षा प्रवासात चोरी करणा-या चार जणांच्या टोळक्यास पोलीसांनी बेड्या ठोकल्या असून, या टोळीने एकाच दिवसात सह प्रवाशी असल्याचे भासवून चार जणांच्या खिशातील मोबाईल व रोडक लांबविली होती. अटक केलेल्यांमध्ये चालकाचाही समावेश असून ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती शाखेने केली.
रूपेश कैलास भागवत (२२ रा.गजराज चौक,खैरेगल्ली),मोईन मेहबुब शहा (२२ रा.म्हाडा बिल्डींग,वडाळागाव)आरिफ सादिक शेख (३४ रा.नानावली) व नवशाद नजाकत खान (२० रा.समतानगर टाकळी) अशी संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी पंचवटी दोन,मुंबईनाका एक आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. धुळे जिह्यातील विश्वास पवलू आहिरे (४८ रा.पिंपळनेर ता.साक्री) हे गुरूवारी (दि.७) कामानिमित्त शहरात आले होते. विद्या विकास सर्कल येथे जाण्यासाठी त्यांनी टकले नगर ते निमाणी बस थांबा दरम्यान रिक्षा प्रवास केला असता ही घटना घडली होती. सहप्रवासी असलेल्या त्रिकुटाने नकळत त्यांच्या खिशातील मोबाईल व १ हजार ६०० रूपयांची रोकड असा सुमारे ११ हजार ६०० रूपयांचा ऐवज हातोहात लांबविला होता. तर निमाणी ते आडगावनाका या रिक्षाप्रवासात राजेंद्र खंडेराव देशमुख (रा.देशमुख वस्ती,आडगाव) यांच्या खिशातील चार हजार रूपये किमतीचा मोबाईल भामट्यांनी लांबविला होता.
तर सिडकोत जाण्यासाठी मनोहर हनुमंतराव कावळे (रा.पाटीलनगर) हे वृध्द जिल्हारूग्णालया समोरील थांब्यावर एका अॅटोरिक्षात बसले असता त्यांच्या खिशातील पाकीट चोरीस गेले होते. पाकिटात रोकडसह महत्वाची कागदपत्र असा सुमारे दोन हजार ३३० रूपयांचा ऐवज होता. एकाच दिवशी या तीन व तत्पूर्वी एक अश्या चार घटना घडल्याने पोलीस आयुक्त दीपक पाण्डये यांच्या आदेशान्वये पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार आणि सहाय्यक आयुक्त मोहन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती शाखेचे वरिष्ठ निरीक्षक डॉ.सिताराम कोल्हे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पथकाने ठिकठिकाणच्या सीसीटिव्ही फुटेज आणि खब-यांच्या माध्यमातून विना नंबर असलेली अॅटोरिक्षा हुडकून काढत संशयीतांना बेड्या ठोकल्या. दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरात संशयीतांना सापळा लावून जेरबंद करण्यात आले. या टोळक्याने चार चोºयांची कबुली दिली असून त्यांना पंचवटी पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाई डॉ.कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक निरीक्षक धर्मराज बांगर,सचिन सावंत,उपनिरीक्षक महेश शिंदे,हवालदार राजेंद्र निकम,आत्माराम रेवगडे,नामदेव सोनवणे,भरत हिंडे पोलीस नाईक शाम पाटील शिपाई विशाल वाघ,अनिल शिंदे,मिलींद बागुल,अतुल पाटील,सचिन अजबे,युवराज कानमहाले,रेखा गायकवाड,निलीमा निकम,रूचा हिरे दीपक पाटील आदींच्या पथकाने केली.