रिक्षा, स्कूल व्हॅन, टॅक्सी चालक व वाहतूक कामगारांना आर्थिक मदतीची मागणी
नाशिक – लॉकडाऊन काळात रिक्षा, टॅक्सी, स्कूल व्हॅन व अन्य वाहतूक क्षेत्रातील असंघटीत कामगार राज्यव्यापी आंदोलनाच्या तयारीत आहेत. सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातील कामगारांना १० हजार रुपये आर्थिक सहाय्य द्या व अन्य मागण्यांसाठी पाच ऑगस्ट रोजी आंदोलन केले जाणार आहे.
यापूर्वी सीटूच्या माध्यमातून सहा हजार रिक्षाचालकांनी लॉकडाउन काळात झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून दहा हजार रुपये आर्थिक अनुदानाची मागणी अर्ज सरकारकडे दाखल केले आहेत. ५ ऑगस्ट रोजी विविध रिक्षा स्टॉपवर रिक्षा चालक निदर्शने करणार आहेत. तसेच सीटू भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रिक्षा रॅली काढण्यात येणार आहे. रिक्षा, स्कूल बस, टॅक्सी चालक, ट्रक चालक या सर्वांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिक जिल्हा रिक्षा टॅक्सी चालक-मालक संघटनेचे सिताराम ठोंबरे, देविदास आडोळे, तानाजी जायभावे, संजय पवार, संतोष काकडे आदींनी केले आहे.
या आहेत प्रमुख मागण्या
रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करून रिक्षा-टॅक्सी, स्कूल व्हॅन व इतर वाहनचालकांना कल्याणकारी योजना लागू करा, वाहन कर्जावरील व्याज माफ करावे, नवीन मोटर वाहन कायद्यातील जाचक अटी रद्द कराव्यात, अर्ध्या किंमतीमध्ये पेट्रोल, डिझेल, गॅस व विमा उपलब्ध करावा, पासिंग, विमा व नूतनीकरणाची मुदत २०२१ पर्यंत वाढवावी, वाहनांची वीस वर्षाची स्क्रॅप मर्यादा रद्द करावी इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत.