नाशिक : शहरात रिक्षा प्रवासात चोरी करणारी टोळी सक्रीय झाली असून,सहप्रवाशी म्हणून रिक्षात बसलेल्या या टोळीने एकाच दिवसात तीन प्रवाश्यांच्या मोबाईल आणि रोकडवर डल्ला मारला. ही घटना गुरूवारी (दि.७) घडली. प्रवाश्यांना लक्ष करणा-या टोळीत रिक्षाचालकाचाही समावेश असल्याचे बोलले जात असून, याप्रकरणी पंचवटी आणि मुंबईनाका पोलीस ठाण्यात वेगवेगळे चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. धुळे जिह्यातील विश्वास पवलू आहिरे (४८ रा.पिंपळनेर ता.साक्री) हे गुरूवारी कामानिमित्त शहरात आले होते. विद्या विकास सर्कल येथे जाण्यासाठी त्यांनी टकले नगर ते निमाणी बस थांबा दरम्यान रिक्षा प्रवास केला असता ही घटना घडली. सहप्रवासी असलेल्या त्रिकुटाने नकळत त्यांच्या खिशातील मोबाईल व १ हजार ६०० रूपयांची रोकड असा सुमारे ११ हजार ६०० रूपयांचा ऐवज हातोहात लांबविला. ही घटना रिक्षातून उतरल्यावर निदर्शनास आली. दुसरी घटना निमाणी ते आडगावनाका दरम्यान घडली. आडगाव शिवारातील देशमुख वस्ती येथील रहिवासी राजेंद्र खंडेराव देशमुख हे गुरूवारी दुपारच्या सुमारास आपल्या घरी जाण्यासाठी निमाणी येथून रिक्षात बसले होते. सहप्रवासी असलेल्या तीन जणांपैकी कुणी तरी त्यांच्या खिशातील चार हजार रूपये किमतीचा मोबाईल चोरून नेला. दोन्ही घटनांप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करम्यात आले असून अधिक तपास पोलीस नाईक वाडेकर आणि बैरागी करीत आहेत. तिसरी घटना त्र्यंबकरोडवरील सिडकोतील त्रिमुर्तीचौक भागात राहणारे मनोहर हनुमंतराव कावळे (रा.पाटीलनगर) हे वृध्द गुरूवारी दुपारच्या सुमारास आपल्या घरी जाण्यासाठी जिल्हा रूग्णालया समोरील थांब्यावर एका अॅटोरिक्षात बसले असता ही घटना घडली. सहप्रवासी असलेल्या चोरट्या त्रिकुटाने नकळत त्यांच्या खिशातील पाकिट चोरून नेले. या पाकिटात रोकडसह महत्वाची कागदपत्र असा सुमारे दोन हजार ३३० रूपयांचा ऐवज होता. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार आनंदा शिंदे करीत आहेत. दरम्यान लागोपाठ एकाच दिवशी घडलेल्या या तीन घटनांमध्ये रिक्षाचालकाचा समावेश असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून या टोळीमळे नाहक रिक्षा चालक बदनाम होत आहेत. त्यामुळे या चोरट्या टोळीचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता होवू लागली आहे.