नवी दिल्ली – गेल्या १८ महिन्यांपासून रिक्त असलेल्या काँग्रेस अध्यक्षपदी नक्की कोण विराजमान होणार हा यक्ष प्रश्न असून राहूल गांधी मात्र या पदासाठी अनुत्सुक असल्याची बाब समोर आली आहे. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीनंतर राहूल गांधींनी कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ऑगस्टमध्ये सोनिया गांधींकडे हंगामी अध्यक्षपदाची धुरा आहे. मात्र, पक्षातील सध्या असलेले वादविवाद पाहता राहुल गांधींना अध्यक्ष होण्याची इच्छा नसल्याची बाब राजकीय वर्तुळात सध्या विशेष चर्चेची बनली आहे.
असा आहे पक्षाचा बी प्लॅन
पक्षाचे माध्यम प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, ९९ टक्के लोकांना राहुल गांधी यांना अध्यक्ष म्हणून हवे होते. परंतु आता राहुल गांधी स्वत: अध्यक्ष होण्यास टाळाटाळ करीत आहेत. अशा परिस्थितीत पक्षाने स्वत: साठी बी योजना तयार केली आहे. कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांशी अध्यक्षपदी निवडीविषयी बोललो, ज्यांपैकी काहीजण पक्षाच्या मूळ गटात आहेत. त्यापैकी दोघांनी सांगितले की, राहुल गांधी यांचे मन वळवण्याचे अनेक प्रयत्न झाले पण ते या पदावर परत येण्यास टाळाटाळ करीत होते. तिसर्या नेत्याने सांगितले की अलीकडील काळात राहुल गांधी कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख म्हणून परत येणार नाहीत हे आता जवळपास निश्चित झाले आहे.
दरम्यान, सोनिया गांधींच्या प्रकृती ठीक नसल्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी सक्रिय नेत्याची मागणी केली आहे. यावर्षी ऑगस्टमध्ये कॉंग्रेसच्या २३ नेत्यांनी सोनिया यांना पत्र लिहून पक्षाच्या कार्यशैलीत बदल करण्याची मागणी केली होती. या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्यामध्ये खासदार शशी तारूर आणि मनीष तिवारी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हूडा आणि महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश होता.