चांदवड – चांदवड व देवळा तालुक्याला जोडणारा प्रधानमंत्री सडक योजनेतील रस्त्यावर राहुड शिवारात लगतच्या शेतकऱ्याने केलेल्या अतिक्रमणामुळे सदर रस्त्यावर छोटे मोठे अपघात होत असून या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी राहुड येथील माजी सैनिक वाल्मिक पवार यांच्यासह राहुड व नांदुरटेक येथील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री, सचिवालय कक्ष, विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे केली आहे.
या रस्त्याचे काम संपूर्ण रुंदीसह करण्यात आलेले होते. रस्त्याने एकाचवेळी दोन गाड्यांसह ये-जा करीत असतांना सदरच्या रस्त्यावर राहुड शिवारातील माध्यमिक विद्यालय ते शिवाजी केदू सूर्यवंशी यांच्या शेतापर्यंतच्या रस्त्यावर खंडेराव केदू सोमवंशी यांनी पोकलंडच्या सहाय्याने काढलेले मोठमोठे दगड रस्त्यावर टाकून तेथ पर्यंत सपाटीकरण केल्याने रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. परिणामी या ठिकाणावर अपघाताचे प्रमाण वाढत असून येथील जनतेला अडचणीला सामोरे जावे लागत आहे. या बाबतचे निवेदन मुख्यमंत्री कार्यालयाकडे दिलेले असून त्याची प्रत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता नाशिक, प्रादेशिक विभाग नाशिक सा.बां, उपविभाग नाशिक,तसेच जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार चांदवड यांच्याकडे ६ आॅगस्ट रोजी दाखल करूनही या बाबत अद्याप कुणीही दखल न घेतल्याने माजी सैनिक वाल्मिक गंगाधर पवार यांच्यासह नागरिकांनी शासनाच्या संबधित कार्यालयाविरुद्द तीव्र संताप व्यक्त केला आहे. या संदर्भात शासनाने वेळीच दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.