पिंपळगाव बसवंत, ता. निफाड – तालुक्याचे एकेकाळचे वैभव असलेले निफाड व रानवड हे सहकारी साखर कारखाने भाडे तत्वावर देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार दिलीप बनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.
नाशिक जिल्हा हा कृषिप्रधान असून, या जिल्ह्यातील सहकारी तत्त्वावरील एकमेव कादवा सहकारी साखर कारखाना व इतर दोन खासगी साखर कारखाने सुरू आहेत. नाशिक जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना इतर जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर अवलंबून राहावे लागते. निफाड तालुक्यात आठ हजार हेक्टर क्षेत्रावर १० ते १२ लाख मेट्रिक टन उसाचे उत्पादन घेतले जाते. परंतु, तालुक्यातील कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना लि., काकासाहेब नगर (रानवड) व निफाड सहकारी साखर कारखाना लि., पिंपळस हे दोन सहकारी साखर कारखाने व केजीएस शुगर इन्फ्रा प्रायव्हेट लि. हा एक खासगी साखर कारखाना आर्थिक अडचणींमुळे गेल्या काही वर्षापासून बंद अवस्थेत आहे. यातील दोन सहकारी साखर कारखाने भाडेतत्त्वावर चालू होऊ शकतात. यासाठी तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची होणारी हेळसांड थांबविणे आवश्यक असल्याचे बनकर यांनी बैठकीत सांगितले.
जनहित डोळ्यासमोर ठेवून या बाजार समितीने दाखल केलेल्या प्रस्तावास शासन स्तरावरून तातडीने परवानगी देण्यात येईल, असे बैठकीत निश्चित झाले. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था दोन कोल्ड स्टोरेज व्यावसायिक रित्या यशस्वीपणे चालवित आहे. या संस्थेस कारखाना चालविण्यास दिल्यास शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजार भाव मिळेलच, त्याचबरोबर कामगारांच्या हाताला काम मिळून कारखान्यावर अवलंबून असणाऱ्या इतर व्यावसायिकांचे व्यवसाय सुरळीत चालू होतील व रोजगारही उपलब्ध होईल, असे बैठकीत सांगण्यात आले. त्यानुसार दाखल केलेल्या प्रस्तावास कागदपत्रांची पूर्तता करून विशेष बाब म्हणून परवानगी द्यावी तसेच या दोन्ही संस्थांना कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे, अशी सूचना अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्याचे बनकर यांनी सांगितले आहे.
यावेळी राज्याचे पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजकुमार देवरा, पणन संचालक सतीश सोनी, सहकारी संस्थांचे सहकार आयुक्त व निबंधक अनिल कवडे, साखर विभागाचे उपसचिव संतोष घाडगे, पणन विभागाचे उपसचिव वळवी, सहकार विभागाचे उपसचिव रमेश शिंगटे आदी अधिकारी वर्ग उपस्थित होते.