पिंपळगाव बसवंत – सुमारे एक वर्षापुर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार दिलीप बनकर यांनी निवडून दिल्यास साखर कारखाने सुरू करून दाखवतो, असे आश्वासन दिले होते. निवडणूक होऊन वर्ष उलटले तरी शासनस्तरावरून सकारात्मक हालचाली होत नव्हत्या. मात्र, रविवारी रासाका सुरू करण्याबाबत निविदा निघाल्याने ऊस उत्पादक, कामगार, सभासदांच्याआशा पल्लवित झाल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या केंद्रस्थानी राहीलेल्या रासाका सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने १५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर कारखाना सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली आहे. सक्षम सहकारी संस्थाना भाडेतत्वावर साखर कारखाने घेता येतील, असा बदल राज्य शासनाने कायद्यात केला आहे. आमदार दिलीप बनकर यांची एकहाती सत्ता असलेल्या पिंपळगांव बाजार समिती, स्व.अशोकराव बनकर पतससंस्था, भिमाशंकर ॲग्रो प्रॉडक्ट या संस्था निविदा भरण्याची शक्यता आहे. दरम्यान, निविदा प्रक्रिया निघाल्याने रासाकाचे धुराडे पेटण्याची शक्यता वाढली आहे.
‘रासाका’नंतर ‘निसाका’
कोरोनामुळे निविदा प्रक्रिया निघण्यास उशिर झाला. मात्र, रासाका सुरू होतोय, याचा आनंद आहे. त्यानंतर ‘निसाका’ सुरू करण्याबाबत आपला प्रयत्न राहील.
– दिलीप बनकर, आमदार, निफाड