नागपूर – ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार, तरुण भारतचे माजी मुख्य संपादक, रा. स्व. संघाचे माजी बौद्धिक व प्रचार प्रमुख, प्रवक्ते माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य (मा. गो. वैद्य) यांचे आज दुपारी निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुनंदा, तीन मुली- विभावरी गिरीश नाईक, डॉ. प्रतिभा उदय राजहंस, भारती जयंत कहू, तसेच पाच मुले- धनंजय, डॉ. मनमोहन (सह सरकार्यवाह, रा. स्व. संघ), श्रीनिवास, शशिभूषण व डॉ. राम (हिंदू स्वयंसेवक संघ, सह संयोजक) असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी (२० डिसेंबर) सकाळी ९.३० वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
द्रष्टे विचारवंत, संपादक, निर्भिड लेखक व जाज्वल्य राष्ट्रप्रेमी अशी त्यांची ओळख होती. त्यांनी त्यांच्या विचारांमधून तसेच प्रखर लेखणीतून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर समाजाचे सातत्यपूर्ण प्रबोधन केले. निष्ठावान स्वयंसेवक असलेल्या मा. गो. वैद्य यांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारधन जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी वेचले. त्यांनी पत्रकारांच्या अनेक पिढ्या घडविल्या. त्यांच्या निधनाबद्दल अनेक क्षेत्रातून आणि मान्यवरांकडून श्रद्धांजली व्यक्त केली जात आहे.