मुंबई – महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ‘राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून येथे इयत्ता ८ वीसाठी प्रवेश पात्रता परीक्षा’ ५ जून रोजी पुणे येथे घेण्यात येणार आहे. ही परीक्षा फक्त मुलांसाठीच आहे. या परीक्षेसाठी परिपूर्ण भरलेली आवेदनपत्रे १५ एप्रिल पर्यंत जमा करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केले आहे.
प्रवेश वयाची अट :
या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांचे वय दि. १ जानेवारी २०२२ रोजी ११ (अकरा वर्ष सहा महिने) पेक्षा कमी व १3 (तेरा) वर्षापेक्षा अधिक नाही असे विद्यार्थी परीक्षेस पात्र समजण्यात येतील. म्हणजेच विद्यार्थ्यांचा जन्म दि. २ जानेवारी २००९ च्या आधी आणि दि. १ जुलै २०१० च्या नंतरचा नसावा. (म्हणजेच विद्यार्थ्याचा जन्म दि. २ जानेवारी २००९ ते दि. १ जुलै २०१० या कालावधीत असावा.)
शैक्षणिक पात्रता :
विद्यार्थी दि. १ जानेवारी २०२२ ला कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमध्ये इ. ७ वी या वर्गात शिकत असावा किंवा ७ वी उत्तीर्ण असावा.
परीक्षेसाठी कमांडंट, राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड-२४८ ००3 यांचेकडून विहीत नमुन्यातील आवेदनपत्रे घ्यावयाची आहेत. विद्यार्थ्यांनी अनुसूचित जाती/जमातीसाठी रु. ५५५/- (जातीच्या दाखल्याच्या सत्यप्रतीसह) आणि जनरल संवर्गातील विद्यार्थ्यांनी रु. ६००/- चा डिमांड ड्राफ्ट देणे आवश्यक आहे. डिमांड ड्राफ्ट फक्त स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचाच असावा तो ‘कमांडंट, आर.आय.एम.सी., डेहराडून, यांचे नावे काढावा, डिमांड ड्राफ्टवर पेअेबल ॲट डेहराडून (तेलभवन बॅक Code No ०१५७६) अशी नोंद करावी व तो कमांडंट, राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून, उत्तराखंड २४८ ००3,’ या पत्त्यावर पाठवून देण्यात यावा. (तसेच आवेदनपत्र आपल्याला प्राप्त होण्यासाठी पूर्ण पत्ता पिनकोडसह, स्पीड पोस्ट पाकिटावर नमूद करावा.) डिमांड ड्राफ्ट पाठविल्यानंतर आवेदनपत्र, माहितीपत्र व मागील १० वर्षाच्या प्रश्नपत्रिका संच कमांडंट, राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांचेकडून स्पीड पोस्टाने दिलेल्या पत्त्यावरती पाठविण्यात येतील.
परिपूर्ण भरलेली आवेदनपत्रे दि. १५ एप्रिल २०२१ पर्यंत मा.आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, १७, डॉ. आंबेडकर मार्ग, लाल देवळाजवळ, पुणे-४११ ००१ यांचेकडे पोहचतील अशा प्रकारे स्पीड पोस्टाने पाठवावीत किंवा समक्ष जावून जमा करावीत. त्यानंतर आलेली आवेदनपत्रे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारण्यात येणार नाहीत. आवेदनपत्र (फॉर्म) कमांडंट RIMC, डेहराडून यांच्याकडून मागविण्याकरिता www.rimc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने पैसे भरुर फॉर्म आवेदनपत्राची मागणी करु शकता.
आवेदनपत्र दोन प्रतीत भरणे आवश्यक आहे व त्यासोबत जन्मतारखेच्या दाखल्याची प्रत, जातीच्या दाखल्याची (अनुसूचित जाती/जमातीसाठी) छायांकित एक प्रत, अधिवास दाखल्याची सत्यप्रत (Domicile Certificate) जोडणे आवश्यक आहे. तसेच शाळेच्या बोनाफाईड सर्टिफिकेटची मूळ प्रत फोटोसह जोडणे आवश्यक आहे.
परीक्षेसाठी इंग्रजी, गणित आणि सामान्यज्ञान या तीन विषयांचे पेपर असतील. गणित व सामान्यज्ञान विषयांच्या प्रश्नपत्रिका इंग्रजी/हिंदी या भाषेत उपलब्ध होतील.
लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची मौखिक परीक्षा दि. ०६ ऑक्टोबर २०२१ रोजी होईल. कोविड-१९ च्या प्रादूर्भावामुळे लेखी परीक्षा व मुलाखतीच्या तारखेत बदल होऊ शकतो याची नोंद घ्यावी, असे आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी कळविले आहे.