कोरोना आणि आयुर्वेद
– डॉ. वैभव दातरंगे
सामाजिक आरोग्य सल्लागार तथा सचिव, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन , नाशिक जिल्हा शाखा
“राष्ट्रीय आयुर्वेद दिना” निमित्त सर्वांना निरामय शुभेच्छा!! गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जग कोरोना नावाच्या जनपदोध्वंस विकाराने झाकोळले आहे. दैनंदिन व्यवहार, अर्थव्यवस्था सर्व काही बाधित झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जीवन पद्धती आणि आयुर्वेद वैद्यक शास्त्राचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. साथीच्या रोगांचे हे वैशिष्ट्य आहे की, जाती, वय, प्रकृती, रोगप्रतिकारक्षमता इत्यादी गोष्टी व्यक्तिपरत्वे भिन्न असूनही या रोगाची बाधा सर्वांना जवळजवळ एकाच वेळी व एकाच प्रकारची होते.
प्रतिबंधक उपाययोजना तसेच शरिराची स्वत:ची व्याधी प्रतिकारक्षमता यामुळे साथीच्या रोगांच्या कारणांना प्रतिबंध करण्याची क्षमता वाढते. आयुर्वेदाचा गाभा असलेले दिनचर्या, ऋतुचर्या, वैयक्तिक स्वच्छता आणि सामाजिक वावराचे संकेत हेच कोरोना प्रतिबंधक उपाय योजना म्हणून सर्वत्र अंगिकार करण्यात आले आहेत. येवू घातलेल्या लसीकरणाने कोरोना नियंत्रणात नक्कीच आणता येईल, ज्यामुळे रोग-प्रतिकारक शक्ति सुधारून, आजारावर नियंत्रण आणता येईल.
लसीकरणाची परिणामकारकता ही ज्याप्रमाणे लसीच्या उत्तम निर्मितीवर अवलंबून आहे. त्याचप्रमाणे आपल्या शरीरांतर्गत, निसर्गदत्त प्रतिकारक शक्तीवर देखील आहे. भारतीय पारंपारिक आरोग्य व्यवस्थेत “रोगप्रतिकार शक्ती” वाढविण्यासाठी, टिकवून ठेवण्यासाठी असलेल्या उपाययोजनांचा उपयोग समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन राज्यभर ” निमा आयुर्वेद इम्यनिटी क्लिनिक्स” सुरु करण्यात आले. येथे विशेष उल्लेख मुद्दाम करावासा वाटतो की “निमा इम्युनिटी क्लिनिकची संकल्पना आपल्या नाशिकमधील आयुर्वेद शास्त्रज्ञांनी प्रसवली व मुर्त स्वरुपात आणली.
निमा आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिक च्या माध्यमातून प्रत्येकाचा व्याधी क्षमत्व निर्देशांक तपासाला जातो. या निर्देशांकानुसार आपल्या शरीराची सद्य स्थिती काय आहे? व त्यानुसार स्वाभाविक व्याधिक्षमत्व वाढविण्यासाठी काय उपायोजना करण्याची आवश्यकता आहे याविषयी तज्ञ डॉक्टर समुपदेशन देतात. व्यक्तीसापेक्ष आहार, योगासने, दैनंदिन सवयी व जीवनमान व्यवस्थापन मार्गदर्शन केले जाते. कोरोना विरुद्ध “ रोग प्रतिकार शक्ती” हे प्रभावी हत्यार नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन ने उभारले आहे. महाराष्ट्र शासनाच्या “आयुष टास्क फोर्स” ने ही संकल्पना समाजात प्रसारित केली आहे.
नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन आयुष पदवीधारक वैद्यकीय व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करते. कोरोना प्रादुर्भाव, टाळेबंदी काळात देखिल संघटनेचे सर्व प्रतिनिधी रुग्ण सेवेत कार्यरत होते. आयुष मंत्रालयाद्वारा प्रमाणित आयुर्वेद उपचाराचा प्रसार आणि जनसामान्यांमध्ये प्रभावी वापर करण्यासाठी सोशल मिडीयाच्या मदतीने वेळोवेळी अनेक वेबिनार, लाइव चर्चा आयोजित करण्यात आल्या. शासकीय सेवेत असलेले वैद्यकीय अधिकारी, कोविड सेवेत विशेष वर्ग केलेले कर्मचारी , सामाजिक आरोग्य अधिकारी याच सोबत खाजगी सेवेतील वैद्यकीय व्यावसायकांनी या काळात अक्षरशः जीवावर उदार होत आपल्या कर्तव्याप्रती निष्ठा प्रकट केल्या. या सर्वांचे येथे मन:पुर्वक अभिनंदन व धन्यवाद व्यक्त करावेसे वाटतात.
नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, नाशिकच्या अध्यक्षा डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली “विश्व आयुष कषाय वटी” आपल्या सर्व सभासदांना निशुल्क उपलब्ध करून दिल्या. निमा नाशिक द्वारा राबविण्यात आलेल्या उपक्रमात संघटनेचे पदाधिकारी मा. डॉ शैलेश निकम, डॉ भूषण वाणी, डॉ मनीष जोशी, डॉ तुषार सूर्यवंशी, डॉ अनिल निकम, डॉ प्रतिभा वाघ, डॉ प्रणीता गुजराथी , डॉ दीप्ती बढे, डॉ मनीष हिरे, डॉ देवेन्द्र बच्छाव यांचे सहकार्य लाभले. लढाई अजून संपलेली नाहीय. जागतिक आरोग्य संघटन तसेच यंत्रणेमार्फत वेळेवेळी येणार्या सुचनांचे तंतोतंत पालन व आरोग्य प्रचार प्रसार करण्याविषयी “नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन” सक्षमपणे कटिबद्ध आहे.