नाशिक – कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांसह पालकांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने शिक्षण शुल्कनीती अभियान सुरु केले आहे. तशी माहिती उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अॅड.चिन्मय गाढे यांनी दिली आहे.
कोरोना विषाणूच्या संकटाचा मोठा परिणाम शिक्षण क्षेत्रावर झाला आहे. काही ठिकाणी शाळा, महाविद्यालय अधिकचे शैक्षणिक शुल्क पालकांकडून जबरदस्तीने घेताना आढळून येत आहे. तर काही ठिकाणी पालक व विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक शुल्कासाठी तगादा लावताना दिसत आहे. अशा परिस्थितीत शाळा महाविद्यालय क्लासेस यांनी शुल्क निश्चित आणि विद्यार्थ्यांकडून शुल्क मागणी याबाबत निश्चित धोरण ठरवणे गरजेचे आहे. अशी भूमिका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी मांडली आहे. यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून येणाऱ्या काळामध्ये कोरोना शिक्षण शुल्कनीती अभियान हि मोहीम राबिण्यात येणार असल्याचे गव्हाणे यांनी सूचित केले आहे.
प्रत्यक्ष भेट देऊन जनजागृती
यानुसार शासनाने सूचित केल्याप्रमाणे कोणत्याही शैक्षणिक संस्थेने शुल्क वाढ करू नये. शक्य असेल तेवढे शुल्क पालक आणि विद्यार्थी यांच्यासोबत चर्चा करून शैक्षणिक संस्थांनी कमी करावे. निश्चित केलेले शुल्क टप्प्याटप्प्याने भरण्यासाठी आराखडा आखावा व त्यानुसार अंमलबजावणी करावी. कोणत्याही परिस्थितीत पालक किंवा विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी सक्ती करू नये. त्याचबरोबर केवळ शुल्क न भरल्याचे कारण दाखवत कोणत्याही विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारच्या शैक्षणिक सुविधेपासून वंचित ठेवू नये. वरील शुल्कनीती सर्व शाळा, महाविद्यालय व क्लासेस समजवून सांगत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी येणाऱ्या काळात गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष/शहराध्यक्ष सर्व शाळा, महाविद्यालय व क्लासेस यांना प्रत्यक्ष भेट देऊन वरील कोविड शिक्षण शुल्कनीती समजावून सांगणार आहे. त्याचबरोबर या शिक्षण शुल्कनीतीचा अबलंब करण्याचा आग्रह धरणार असल्याचे गाढे यांनी सांगितले आहे.