नाशिक – शहरात कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत झपाट्याने वाढत आहे. शहरात काही नागरिक विना मास्क घराबाहेर पडत असून त्यांच्यात जनजागृती व्हावी याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेसने राबविलेल्या “नो मास्क, नो एन्ट्री” या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून शहरात विविध भागात दहा हजार स्टिकर्स लावून जनजागृती करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी दिली.
नाशिकमध्ये कोविड-१९ संसर्गाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना शहरातील नागरिक विना मास्क फिरताना दिसत होते. महानगरपालिका हद्दीत रोज १००० पेक्षा जास्त नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असताना नाशिककरांमध्ये जनजागृती होणे गरजेचे होते. कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू हा कोरोना विषाणूची लक्षण नसताना ऑक्सिजनची पातळी खालावल्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. शहरात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतांना बहुतांश भागात नागरिक विना मास्क फिरत होते. तर काही गर्दीच्या ठिकाणी फिजिकल डिस्टसिंग नियमांचे पालन होताना दिसत नव्हते. नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मास्क व सॅनिटाझरचा वापर हा स्वतःच्या सुरक्षेसाठी करणे गरजेचे असतांना काही जण बेजबाबदारीने वागत होते. नागरिक घरा बाहेरून आल्यानंतर कुटुंबाला विषाणूचा संसर्ग होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. नाशिक महानगरपालिकेने विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंड आकारण्यासोबतच जनजागृती करण्यावर भर देण्याची सध्या नितांत गरज असताना हे काम राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आल्याचेही खैरे यांनी सांगितले. विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती करण्याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहरातील प्रत्येक गर्दीच्या ठिकाणी, दुकानांबाहेर, सरकारी कार्यालयाबाहेर, सोसायटी व इमारतीच्या बाहेर “नो मास्क, नो एन्ट्री” चे दहा हजार स्टिकर्स लावण्यात आले आहे. तसेच दुकानदारांना मास्क न लावता येणाऱ्या ग्राहकांना मास्क लावण्यासाठी आग्रह करण्याची विनंती या जनजागृतीतून करण्यात आली असल्याचे खैरे यांनी सांगितले आहे.