पुणे – पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी झालेल्या गर्दीमुळे पोलीसांनी पुणे शहराध्यक्षांसह पदाधिका-यांवर गुन्हे दाखल केले आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे .शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या कार्यालयाचे उदघाटन झाले होते. यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. विशेष म्हणजे ही गर्दी बघून उपमुख्यमंत्री पवार यांना सुध्दा आश्चर्य वाटले होते. त्यांनी गाडीत असतांना या कार्यक्रमाला न जाण्याचा विचार सुध्दा केला. पण, कार्यकर्त्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून ते गेले. पण, त्यांनी कार्यक्रमात तुम्ही नियम पाळले नाही याची खंत वाटते असे सांगितले होते.
पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या या गुन्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रदीप देशमुख, माजी नगरसेवक निलेश निकम, सरचिटणीस रोहन पायगुडे, माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके यांच्यासह शंभर ते दीडशे महिला आणि पुरुष पदाधिकारी आहे.