नाशिक – ‘नाशिक शहरातील विविध भागात खड्डे पडले असून महानगरपालिका सत्ताधाऱ्यांना विस्मरणाचा आजार जडला आहे. त्यांच्या डोक्यात प्रकाश पडावा व खड्ड्यांची आठवण व्हावी’ असा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखाली खड्ड्यांमध्ये दिवे लावून आंदोलन करण्यात आले.
नाशिक शहरात पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या कामांमध्ये रस्त्यांची कामे केल्याचा दावा नाशिक महानगरपालिकेने केल्यानंतर या रस्त्यांवर मोठे खड्डे असल्याचे नाशिककरांना दिसत आहे. नाशिक शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्याचे वाहनधारकांना अनुभवास मिळत आहे. तीन ते चार वर्षापासून नाशिक शहरातील खड्डे जशाच्या तसे असून या खड्ड्यांवर तात्पुरती मलमपट्टी करण्यात येऊन कोट्यावधीचा भ्रष्टाचार रस्ते दुरुस्ती मध्ये होत आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर तसेच कॉलनी अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे वाहनधारकांना कंबरदुखी व अंगदुखीचा त्रास होत आहे. तसेच या खड्ड्यांमुळे वाहनधारकांचा किरकोळ अपघात होत आहे. या प्रकरणावर सर्व स्तरातून विरोध होत असताना देखील नाशिक महापालिका सत्ताधाऱ्यांनी यावर काम केल्याचे दिसत नाही. उलट नाशिक महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने नऊ हजार खड्डे बुजविण्याचा दावा केला आहे. असे असताना देखील रस्त्यावर खड्डे जशाच्या तसे दिसत आहे. काही रस्त्यांवरील खड्डे मुरूम व माती टाकून तात्पुरते बुजविण्यात आल्याने पावसामुळे मुरूम माती वाहून गेली आहे. त्यामुळे तात्पुरते बुजविलेले खड्डे परत दिसू लागले आहे. महानगरपालिकेतील गुणवत्ता विभागासह बांधकाम विभागात रस्त्यांच्या डागडुजीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून महानगरपालिका सत्ताधाऱ्यांना याबाबत विस्मरणाचा आजार जडला आहे. त्यांच्या डोक्यात प्रकाश पडावा व खड्ड्यांची आठवण व्हावी याकरिता शहरातील खड्ड्यांमध्ये दिवे लावून आंदोलन करण्यात आले.
यावेळी कृष्णाजी काळे, निलेश सानप, बादल कर्डक, डॉ. संदीप चव्हाण, हर्षल चव्हाण, जय कोतवाल, सागर बेदरकर, मुकेश शेवाळे, निलेश भंदुरे, राहुल कमानकर, अक्षय पाटील, संतोष भुजबळ, अमोल सूर्यवंशी, अविनाश मालुंजकर, अक्षय परदेशी, शुभम पांढरे, ऋषिकेश दातीर, आदित्य पवार, यश बोरोले, संकेत जोंधळे, योगेश सोनवणे, गणेश आहेर, निखिल कमानकर, निखिल सूर्यवंशी, निखिल चव्हाण, गोपी बैरागी, अक्षय विभुते, अक्षय गांगुर्डे, राकेश सदांनशिव, राकेश सायखेडकर, बाळा बागुल, शंतनू भोर, दर्शन बाविस्कर आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.