लखनऊ – अयोध्येतील रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी यांनी रविवारी सांगितले की, श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी देशभरातील आर्किटेक्ट आणि संतांकडून सूचना मागवल्या आहेत. टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स लिमिटेड प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम करेल आणि लार्सन व टुब्रो त्यांना बांधकामात मदत करेल असेही ट्रस्टने ठरविले आहे अशी माहिती ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली आहे.
अधिकृत वेबसाइट व वर्तमानपत्रांवरील जाहिरातींच्या माध्यमातून राम मंदिराच्या बांधकामासाठी देशभरातील वास्तुविशारदांच्या सूचना आमंत्रित करत आहोत अशी माहिती स्वामी गोविंद देव गिरी यांनी अयोध्येत राम मंदिर बांधकाम समितीच्या तीन दिवसीय बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना सांगितले. लार्सन अँड टुब्रो ही मुख्य कंपनी आहे जी राम मंदिराचे बांधकाम हाती घेईल, राम मंदिराची सुरक्षा आणि प्रस्तावित संरचनेच्या स्थिरतेसह विविध विषयांवर चर्चा केल्यानंतर बैठकीत हे निर्णय घेण्यात आला.
अयोध्या राम मंदिर बांधकाम समितीची बैठक सर्कीट हाऊस येथे झाली. बैठकीत राम मंदिर बांधण्याशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स लिमिटेड आणि एल अँड टीच्या अधिकाऱ्यांसह ट्रस्टचे अधिकारी व सदस्यांनी बैठकीला हजेरी लावली. या बैठकीला राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा, ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय, सदस्य अनिल मिश्रा आणि ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी महाराज उपस्थित होते.