राममंदिर आंदोलनात नाशिकच्या कार्यकर्त्यांचाही मोठा सहभाग होता. बुधवारी अयोध्येत होणाऱ्या राममंदिर भूमीपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी जागविलेल्या या आठवणी…
५ ऑगस्ट २०२० ही तारीख सर्व भारतीयांच्या स्मरणात राहील. कारण या दिवशी अयोध्येतील राम मंदिर उभारणीच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि साधुसंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या दिवशी देशभरात जणू दिवाळीच साजरी होईल यात शंका नाही. अयोध्या आणि नाशिक यांचे नाते अतूट आहे. प्रभू रामचंद्रांचे वनवासातील वास्तव्य नाशकात होते त्यामुळे राम मंदिराशी संबंधित काही घटना घडली की त्याचे नाशकात पडसाद उमटतात हे तर ओघाने आलेच. राम मंदिराच्या वातावरण निर्मितीसाठी आडवाणींची रथयात्रा असो की त्यानंतर अयोध्येत झालेला गोळीबार आणि नंतर घडलेल्या घटना यात नाशिककरांचा सहभाग मोठा होता.
अयोध्येतील ९० आणि ९२ च्या घटनेत मी कार सेवक म्हणून हिरिरीने भाग घेतला होता आणि मंदिराच्या गर्भगृहापर्यंत धडक मारली होती. पोलिसांच्या लाठीमार आणि गोळीबाराला न जुमानता आम्ही आणि देशभरातील लाखो कारसेवकांनी राम मंदिर व्हावे यासाठी जे कष्ट उपसले त्याला निश्चितच तोड नाही. त्यामुळेच आज राम मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी होत असलेले भूमिपूजन म्हणजे तमाम भारतीयांसाठी एक प्रकारे पर्वणीच असून हा सोहळा नेत्रदीपक होईल, यात शंका नाही.
प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने नाशिक नगरी पुनीत झाली आहे. वनवासाच्या काळात प्रभू रामचंद्र नाशकात वास्तव्यास होते. त्यामुळे अयोध्येत अथवा प्रभू रामचंद्रांनी जेथे जेथे वास्तव्य केले तेथे काही घटना घडली तर नाशिककर त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद देतात आणि त्यात सहभागी होतात. मग ती लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा असो की ९० साली राम मंदिराच्या मागणीसाठी झालेले आंदोलन की ९२ साली अयोध्येत घडलेली घटना. या सर्व कार्यक्रमांमध्ये नाशिकचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रभू रामचंद्र हे आमचे दैवत असून त्यासाठी आम्ही काहीही करू शकतो हे नाशिककरांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे.
नाशिक मध्ये प्रभू रामचंद्रांनी वनवासाच्या काळात वास्तव्य केले होते. तपोवन, पंचवटी आदी भागात त्यांच्या वास्तव्याच्या स्मृती आजही कायम आहेत. आणि म्हणूनच ते बघण्यासाठी जगभरातून पर्यटक नाशकात येत असतात. आयोध्या हे प्रभू रामचंद्रांचे जन्मस्थान. त्यामुळे तेथे एखादी घटना घडली तर नाशकातही त्याचे पडसाद उमटतात. पाचशे वर्षांपूर्वी अयोध्येत राम मंदिर होते. मोगल बादशाह बाबर याने आक्रमण करून तेथे मशीद उभारली. तीच बाबरी मशीद म्हणून ओळखली जाऊ लागली, अशी नोंद आहे. या जागेवर पूर्वीप्रमाणेच राम मंदिर व्हावे अशी मागणी कित्येक वर्षांपासून होत होती. आणि त्यासाठी अनेकांनी आपले बलिदानही दिले.
भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आदी पक्ष आणि विविध हिंदुत्ववादी संघटना यांनी त्यादृष्टीने नेटाने प्रयत्न सुरू केले. १९९० मध्ये लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढून या मुद्द्याबाबत जनजागृती केली. यामुळे संपूर्ण भारत ढवळून निघाला होता. जेथे-जेथे यात्रा गेली तेथे अडवाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे झालेले स्वागत बघता राम मंदिराचा मुद्दा किती महत्त्वाचा आहे हे लोकांना पटत होते. नाशकात ही रथयात्रा आली तेव्हा आडवाणी यांच्याशी समन्वय साधण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली होती. हा मी माझा बहुमानच समजतो. आज ज्यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा होत आहे ते देशवासीयांचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रथाचे सारथ्य करीत होते तर भाजपाचे एक ज्येष्ठ नेते प्रमोद महाजनही नाशकात आले होते.
नाशकात काळाराम मंदिराचा पूर्व दरवाजा तसेच भालेकर हायस्कूल मैदानावर अडवाणींच्या सभा झाल्या. त्याला हजारोंची उपस्थिती होती असे गर्वाने सांगावेसे वाटते. अडवाणींना बिहारमध्ये अटक झाल्यानंतर आता कारसेवकांचे व राम मंदिराचे काय होणार हा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु कारसेवकांनी गनिमी काव्याने आयोध्येकडे कूच सुरू ठेवली होती. नाशिकच्या कारसेवकांचाही त्यात दांडगा सहभाग होता. तत्कालीन खासदार दौलतराव आहेर, आमदार गणपतराव काठे, अण्णासाहेब डांगे, महानगराध्यक्ष बंडोपंत जोशी, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा निशिगंधा मोगल, राजाभाऊ मोगल, अरुण शेंदुर्णीकर, शैलेंद्र जुन्नरे, कृष्णराव नेरे, राहुल निरभवणे, राजाभाऊ घटमाळे, मंगला सवदीकर, शहनाज सय्यद, पुष्पा शर्मा उत्तमराव उगले यांच्यासह नावाची ही यादी खूप मोठी आहे.
उत्तर प्रदेशातील तत्कालीन मुलायमसिंह सरकारने जागोजागी नाकेबंदी केली होती. पुलांवर विजेचा प्रवाहही सोडला होता. तरीही त्याला न जुमानता कारसेवकांनी आयोध्येपर्यंत कुच चालू ठेवली होती. नाशिकच्या लोकांना बिना येथे अडविण्यात आले. तरीही तेथून काही लोकांनी पलायन करून अयोध्या गाठली. मलाही गर्भगृहापर्यंत मजल मारता आली होती. लोक एकमेकांच्या अंगावर पडत होते. परंतु श्रीरामाचा जयघोष मात्र सुरूच होता.
पळापळीत आणि धक्काबुक्कीत ठिकठिकाणी मला खरचटले. परंतु त्यावेळी जोश इतका होता की आम्हाला त्याचे काही वाटत नव्हते. आमच्या समोर गोळीबारात अनेक जण मृत्युमुखी पडले, तर काही लाठीमारात जायबंदी झाले. नंतर १९९२ मध्ये अयोध्येत पुन्हा राम मंदिरासाठी हाक देण्यात आली. त्यावेळीसुद्धा नाशकातून शेकडो कारसेवक आयोध्येकडे रवाना झाले होते. बाबरी मशिदीची घटना घडली तेव्हा कारसेवकांनी एकच जल्लोष करून राम नामाचा जयघोष सुरू केला होता.
आमच्यासाठी हा अत्यंत सर्वोच्च क्षण होता. आम्हाला अटक झाली परंतु राम मंदिरासाठी आम्ही खारीचा वाटा उचलला याचा आजही आम्हाला अभिमान वाटतो.