नवी दिल्ली – लंकेत सीता मातेला बंदी केल्याच्या ठिकाणावरील एका दगडाचा वापर अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या बांधकामात केला जाणार आहे. संबंधित दगड श्रीलंकेतील सीता एलिया या ठिकाणावरून आणण्यात येणार आहे.
श्रीलंकेचे राजदूत मिलिंडा मोरागोडा हा दगड भारतात आणण्याची शक्यता आहे. सीता एलियामध्ये सीतामातेचं एक मंदिर आहे. रावणाने सीता मातेला ज्या ठिकाणी बंदी बनवून ठेवले होते, त्याच ठिकाणावर हे मंदिर बांधण्यात आले आहे. रावणाच्या तावडीतून सुटकेसाठी सीतामाता प्रभू रामचंद्रांची आराधना करायच्या ती हीच जागा आहे, असे मानले जाते.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत भव्य राम मंदिर बांधकामासाठी कोनशिलेचं अनावरण केले होते. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला श्रीराम मंदिराच्या बांधकामाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले होते, की अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी जवळपास तीन वर्षांचा काळ लागू शकतो.