नवी दिल्ली – अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी निधी गोळा करण्याचे काम वेगानं सुरू आहे. मंदिर उभारणाऱ्या ट्रस्टकडून निधी गोळा करण्याचं काम सुरू आहे. लोकंही मोकळ्या हातानं पैसे दान करत आहेत. मंदिरासाठी आतापर्यंत १५०० कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे, असं श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सचिव स्वामी गोविंद देव गिरी यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितलं.
अयोध्येत भव्य मंदिर उभारण्यासाठी संपूर्ण देश निधी दान करत आहे. देशातील ४ लाख गावे आणि ११ कोटी कुटुंब आमच्या अभियानाशी जोडले जावे, असा आमचा उद्देश आहे. १५ जानेवारीपासून आम्ही हे अभियान सुरू केलं आहे. २७ फेब्रुवारीपर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे. लोक फूल न फुलाची पाकळी प्रमाणे दान देत आहेत. ४९२ वर्षांनंतर धर्मासाठी काहीतरी करण्यासाठी लोकांना अशी संधी मिळत आहे, असं गोविंद देव गिरी यांनी सांगितलं.
राम मंदिर ट्रस्टच्या खात्यामध्ये १,५११ कोटी रुपये जमा झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंटपीठानं ९ नोव्हेंबर २०१९ मध्ये राम मंदिरच्या बाजूनं निर्णय सुनावला होता. २. ७ एकर पसरलेल्या वादग्रस्त भूमीला एक ट्रस्ट बनवून त्यांच्याकडे सोपवावे, असं आदेशात म्हटलं होतं. केंद्र सरकारची मंदिराच्या कामावर देखरेख असेल. ५ ऑगस्ट २०२० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या कामाचे भूमिपूजन केलं होतं.