मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका
मुंबई – कोरोना संसर्गाच्या काळात येत्या ५ ऑगस्ट रोजी होणा-या राममंदिराचा भूमिपूजन सोहळा योग्य नाही. हा सोहळा देशातील कोरोनाची परिस्थिती सुधारल्यानंतर धुमधडाक्यात करायला हवा, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ई -भूमिपूजनाचा प्रस्ताव दिला. मात्र, तो आपल्याला मान्य नाही, असे राज ठाकरे म्हणाले. राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एकोपा नाही. हे सरकार फार टिकेल, असे वाटत नाही, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली. लॉकडाऊनमधून अनेक बाबींना सूट द्यायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच कोरोना काळात दिसले पण त्यांचे काम काही दिसलेले नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे.