नवी दिल्ली – १९८७ मध्ये रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेत रामाची भूमिका निभावणारे आणि घराघरात पोहोचलेले अरुण गोविल यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. पश्चिम बंगाल आणि इतर चार राज्यांमध्ये होणार्या विधानसभा निवडणुकांपूर्वी `रामा`ला भाजपमध्ये दाखल करून घेण्याच्या निर्णयास राजकीय विश्लेषक महत्त्वाचं मानत आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून `जय श्रीराम` च्या घोषणा सुरू आहेत. त्यामुळे अरुण गोविल यांचा पक्षप्रवेश फायदेशीर ठरू शकतो, असं जाणकारांचं म्हणणं आहे.
धार्मिक मालिकेत काम करणाऱ्या एखाद्या पात्राला भाजपनं प्रथमच संधी दिली असं नाही. रामायणमधील अरुण गोविल यांच्यासह रावणाची भूमिका निभावणारे अरविंद त्रिवेदी आणि सीतेची भूमिका करणार्या दीपिका चिखलिया यांनीसुद्धा भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. तसेच द्रौपदी आणि श्रीकृष्णाची भूमिका निभावणारे कलाकारसुद्धा भाजपवासी झालेले आहेत.
रामायणमधील रावण अरविंद त्रिवेदी यांनी भाजपकडून १९९१ मध्ये निवडणूक लढवली आहे. गुजरातमधील सबरकांठा इथून ते निवडणूक जिंकले होते. ते २००२ मध्येसुद्धा निवडणुकीत विजयी झाले होते. १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत दीपिका चिखलिया यांनी निवडणुकीत विजय मिळवला होता. दीपिका या गुजरातमधील बडोदा इथून निवडणूक जिंकून संसदेत पोहोचल्या होत्या.
महाभारत मालिकेत द्रौपदीची भूमिका करणार्या रुपा गांगुली सध्या राज्यसभेत खासदार आहेत. पश्चिम बंगालमध्ये त्या भाजपचा प्रचार करत आहेत. २०१५ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बंगालमध्ये त्या मोठ्या नेत्या म्हणून समोर आल्या आहेत. महाभारतातील श्रीकृष्ण नितीश भारद्वाज १९९६ ते १९९८ पर्यंत भाजपकडून लोकसभेत खासदार राहिले आहेत. रामायणात हनुमान बनलेल्या दारा सिंग यांची २००३ मध्ये राज्यसभेत निवड करण्यात आली होती. अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकालात भाजपनं दारा सिंग यांना राज्यसभेत पाठवलं होतं.