मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे श्रीरामजन्मस्थानी भव्य मंदिराचा पायाभरणी समारंभ आज (५ ऑगस्ट) झाल्यानिमित्त भाजपच्यावतीने महाराष्ट्रात दिवाळी साजरी करण्यात आली. आयुष्यातील हा महत्त्वाचा दिवस सर्वांनी वैयक्तिक पातळीवर घरोघरी दिवाळीसारखा साजरा करावा. मात्र सामुहिक उत्सव टाळावा आणि कोरोनाचे भान ठेवावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. भाजपचे प्रमुख पदाधिकारी प्रसिद्ध राम मंदिरांमध्ये दाखल झाले. तेथे त्यांनी पूजा केली.
मंदिराच्या पायाभरणीचा दिवस एरवी आपण खूप धुमधडाक्यात साजरा केला असता पण कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता सर्वांनी वैयक्तिक पातळीवर उत्सव साजरा करावा. मंदिराच्या पायाभरणी समारंभाचा दिवस म्हणजे घरात दिवाळी आहे, असे समजून खूप मोठ्या प्रमाणात साजरा करावा, असे पाटील यांनी सांगितले होते. त्यानुसार, भाजप नेते व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या घरावर रोषणाई केली, काही जणांनी गुढी उभारली, घरावर कंदिल लावला, घरासमोर पणत्या लावल्या आणि रांगोळीही काढली. भाजप पदाधिकाऱ्यांनी कुटुंबियांच्या सोबत टीव्हीवर भूमीपूजनाचा कार्यक्रम पाहिला. त्यानंतर काही भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.