पाटणा – अयोध्येत श्री राम मंदिर बांधण्यासाठी देशभरातून देणगी देण्यात येत आहे. यात सर्वाधिक देगणी भक्त हनुमानजी यांची आहे, असे म्हटले जाते. कारण रामजन्मभूमी मंदिराच्या बांधकामासाठी पाटण्यातील हनुमान मंदिराने तब्बल पाच कोटी रुपयांची देगणी दिली आहे.
हनुमान मंदिराच्या वतीने येत्या पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने ही रक्कम देण्यात येईल. पाटण्यातील राजवंशी नगर हनुमान मंदिरानेही यासाठी १० लाख रुपयांची देणगी दिली आहे. बिहारच्या इतर अनेक मंदिर समित्यांनीही रामजन्मभूमी मंदिर बांधकाम निधी संकलनातून पैसे दान केले आहेत.
रामजन्मभूमी मंदिराच्या उभारणीसाठी निधी गोळा करण्याची मोहीम १ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात आली होती. मोहिमेचा एक भाग म्हणून संकलन संघ बिहारच्या गावातून गावात फिरत होते आणि पैसे गोळा करीत होते.बिहारमध्ये देणगी देण्यात पटना आघाडीवर होते, येथून सुमारे ६ कोटींपेक्षा जास्त रक्कम प्राप्त झाली. दानापूरने स्वतंत्रपणे सुमारे १ कोटींची देणगी दिली.
दरम्यान, रामजन्मभूमी मंदिर निर्माण निधी समितीने एक अॅप तयार केला होता, ज्यात बँकांकडील रक्कम आणि धनादेश मिळाल्यानंतर खात्यात एकूण ठेवी दाखविल्या जातात. बिहारमध्ये निधी संकलन टीमच्या माध्यमातून २२ कोटी ८० लाख ५२ हजार ६२९ रुपये जमा झाले. तर बँकांनी १९ कोटी ५५ लाख 62 हजारांची मोजणी पूर्ण केली आहे. या मोहिमेअंतर्गत ठेवींची मोजणी व धनादेशांची मंजुरी अद्याप सुरू आहे.