रांची – काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या हम दो हमारे दो या नाऱ्यावर मोदी सरकारमधील मंत्री रामदास आठवले यांनी चांगलीच खेचली आहे. रांचीमध्ये एका कार्यक्रमात सामील झाले असताना आठवले यांनी राहुल गांधी यांना एक चांगलाच टोमणा मारला.
संसदेपासून ते सभांपर्यंत आपल्या कविता आणि गमतीदार भाषणांसाठी रामदास आठवले ओळखले जातात. रांची येथेही गप्पागप्पांमध्ये त्यांनी राहुल गांधी यांना दलित तरुणीशी लग्न करून महात्मा गांधींचे स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन केले. हम दो हमारे दोसाठी पहिले लग्न तर करा, असेही ते राहुल गांधींना म्हणाले आहे. रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडियाचे अध्यक्ष तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधींना दलित तरुणीशी लग्न करण्याचे आवाहन केले. त्यांनी असे केल्यास महात्मा गांधींचे स्वप्न पूर्ण होईल. तसेच त्यांनी जातीवर आधारित जनगणनेलाही समर्थन दर्शवले. अश्यापद्धचीच्या जनगणनेमुळे जातीभेद वाढण्याची शक्यता व्यक्त करणे चुकीचे आहे. घरातील मुलं वयाच्या पाचव्या–सहाव्या वर्षी आपल्या जातीच्या बाबतीत समजून जातात, असे ते म्हणाले. त्याचवेळी दामोदर घाटी योजनेला डॉ. भीमराव आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी त्यांनी केली. आठवले म्हणाले की जेव्हा ते केंद्रात सिंचन मंत्री होते तेव्हा या योजनेचे भूमिपूजन मी केले होते. त्यामुळे योजनेला नाव देण्याची मागणीही मान्य करायला हवी.
आठवलेंनी मंत्रीपदाचे भान ठेवावे – काँग्रेस
रामदास आठवले यांनी राहुल गांधींच्या बाबतीत विधान केल्यानंतर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे. आठवले यांच्या विधानावर आक्षेप नोंदवत काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष राजेश ठाकूर यांनी म्हटले की आठवले बहकलेली विधाने करतात. त्यांनी किमान आपल्या मंत्रीपदाचे भान ठेवायला हवे आणि बालीश वागणूक थांबवायला हवी.