नवी दिल्ली ः फ्रान्सकडून घेतलेली ५ राफेल विमाने अंबाला येथील हवाई दलाच्या तळावर उतरली आहेत. या राफेल विमानांना २ सुखोई-३० विमानांनी सोबत केली. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आर के एस भदुरिया या विमानांच्या स्वागतासाठी उपस्थित आहेत.
फ्रान्स ते भारत या दरम्यानच्या प्रवासात या विमानांनी केवळ संयुक्त अरब अमिरातीमध्ये विसावा घेतला. फ्रान्सच्या टँकरनी जमिनीपासून ३० हजार फुटांवर त्यांच्यात इंधन भरले होते. तब्बल दोन दशकांनंतर पहिल्यांदा नवी लढाऊ विमानं भारतीय हवाई दलात सहभागी होत आहेत.
भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्यात आणखी वाढ करणाऱ्या अत्याधुनिक पाच राफेल लढाऊ विमानांची पहिली तुकडी सुमारे ७ हजार किलोमीटरचा प्रवास करून उद्या हरयानातल्या अंबाला येथील हवाई तळावर दाखल होणार आहे. त्यानंतर या विमानांचा हवाई दलाच्या ताफ्यात अधिकृतपणे समावेश होईल. ही विमानं हवेतल्या हवेत मारा करणाऱ्या अद्ययावत क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असून भारताच्या गरजेनुसार अनेक आवश्यक सुविधाही त्यामध्ये आहे.
भारतानं फ्रान्स सरकारशी ५९ हजार कोटी रुपयांचा ३६ विमानांच्या खरेदीचा करार केला असून त्यातली १० विमाने भारताच्या ताब्यात मिळाली आहेत. त्यापैकी पाच विमाने भारतात दाखल होत असून अन्य पाच विमानं प्रशिक्षणासाठी फ्रान्समध्येच असल्याचं फ्रान्समधील भारतीय दूतावासाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. उर्वरित विमाने २०२१ च्या अखेरपर्यंत भारताकडे सोपवली जाणार आहेत.