कृषीमंत्री दादाजी भुसे यांची माहिती
नाशिक – रानमेवा व रानभाज्या हा निसर्गाने दिलेला अनमोल ठेवा आहे. त्याची जपवणूक व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, आदिवासी बांधवांच्या या पारंपरिक रानवैभवाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन कृषीमंत्री तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.
प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात आयोजित जागतिक आदिवासी दिनानिमित्त रानभाज्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. प्रत्येक जिल्ह्यात व प्रमुख शहरांमध्ये हा रानभाज्या महोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात रानभाज्यांचे महत्व अधोरेखित होणार आहे. रानभाज्या ही निसर्गाची देणगी असून कोणतेही रासायनिक खत किंवा मशागतीशिवाय त्या उगवतात. आज कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला या रोगाशी सामना करण्यासाठी शरीरातील प्रतिकारक शक्ती वाढविणे व टिकविणे खुप गरजेचे आहे. या रानभाज्या प्रथिने, पोषणद्रव्य, व जीवनसत्वयुक्त असून इम्युनिटी बुस्टर म्हणून यांचा निश्चितच उपयोग होऊ शकतो. त्यामुळे रानभाज्यांना एक व्यावसायिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही भुसे यांनी सांगितले.
या महोत्सवात जवळपास ३६७ रानभाज्यांचे प्रकार उपलब्ध आहेत व हा ठेवा आपणास जपायचा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात या रानभाज्यांच्या पाककृती यु ट्यूब सारख्या माध्यमाद्वारे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत असेही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यावेळी सांगितले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार देवयानी फरांदे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, कृषी सभापती संजय बनकर, माजी आमदार हेमंत टकले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षक प्राचार्य संजय पाटील, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी सुनिल वानखेडे, उपसंचालक कैलास शिरसाठ, प्रकल्प उपसंचालक हेमंत काळे, उपविभागीय कृषी अधिकारी संजय सूर्यवंशी, दिलीप देवरे, कैलास खैरनार, गोकुळ वाघ आदी उपस्थित होते.
यांचा झाला गौरव
कार्यक्रमात कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते विमल आचारी, मारूती पवार, मधुकर बांगारे, मनोहर चौधरी, सिताराम चौधरी, अनिल पवार तसेच आदर्श शेती शेतकरी गट या शेतकऱ्यांचा प्रातिनिधीक स्वरूपात प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. तसेच के.के. वाघ उद्यान महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापिका अश्विनी चोथे यांचा देखील यावेळी कृषिमंत्र्यांनी गौरव केला.