मुंबई – कोरोनामुळे स्लो झालेल्या रेल्वेने आत्ता कुठे हळूहळू वेग वाढवायला सुरुवात केली आहे. स्पेशल गाड्यांच्या मदतीने अनेक लोक आपल्या घरापर्यंत पोहोचले आहेत. आता तर जवळपास सर्वच गाड्या सुरू झाल्यामुळे सर्वांना प्रवास सोयीचा झाला आहे. मात्र तरीही रेल्वेचे उत्पन्न पाहिजे तसे रुळावर आलेले नाही. अश्यात रात्री धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचे भाडे वाढविण्याची प्रशासनाची तयारी असल्याच्या बातम्या सध्या माध्यमांमध्ये गाजत आहेत.
रेल्वेने हा निर्णय घेतल्यास सर्वसामान्य माणसाचा त्रास वाढेल, यात शंका नाही. कारण कोरोनामुळे तसेही सर्वांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे आणि त्यातून अद्याप कुणीच सावरू शकलेले नाही. त्यामुळे रेल्वेचे भाडे वाढल्यास लोकांना धक्का बसेल. फेसबुक व इतर सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर भाडेवाढीच्या बातम्या चांगल्याच व्हायरल झालेल्या आहेत. भारतीय रेल्वे प्रवाश्यांकडून १० टक्के अधिकचे भाडे घेण्याच्या तयारीत आहे. हे काम रेल्वेचे उत्पन्न वाढविण्यासाठी केले जात आहे. रेल्वेतील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी मंत्रालयाला रात्रीच्या गाड्यांचे भाडे वाढविण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. त्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. ते झाल्यावर होळीच्या दरम्यान धावणाऱ्या गाड्यांचे भाडे वाढलेले असेल. मार्च अखेरपर्यंत प्रवाश्यांवर हे वाढलेले भाडे लादण्यात आलेले असेल, अशीही चर्चा आहे. लॉकडाऊनमुळे सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ सर्व सेवा बंद होत्या. त्यात रेल्वेचा वापरही केवळ जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि स्थलांतलीत मजुरांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी होत होता. त्यामुळे रेल्वेला प्रवासी होते, पण उत्पन्न नव्हते. अश्यात खूप मोठे नुकसान रेल्वेला भोगावे लागले. ते भरून काढण्यासाठी रेल्वेने आता वेगवेगळ्या गाड्या नव्याने सुरू केल्या आहेत. पण तरीही रात्रीच्या प्रवासाचे भाडे वाढविण्याचा विचार सुरू आहे.