ठाणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनेक विषयांवर थेट भाष्य केले आहे. बघा काय म्हणाले ते
- सरकारने आणलेला कृषी कायदा चुकीचा नाही. त्यात काही त्रुटी असतील. त्या-त्या राज्यातल्या सरकारांशी त्यांच्या कृषी धोरणांनुसार केंद्र सरकारने समन्वय साधून कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे. काही मोजक्या लोकांच्या हातामध्ये सर्व नियंत्रण जाऊ नये हीच देशवासियांची इच्छा आहे.
- चीन-पाकिस्तानच्या सीमेवरही इतका कडेकोट बंदोबस्त नसेल इतका बंदोबस्त शेतकऱ्यांसाठी करण्याची काहीही आवश्यकता नाही. शेतकरी आंदोलनाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत असताना पंतप्रधानांनी लक्ष घालून प्रश्न मिटवायला हवा.
- वाढीव वीजबिलांविरोधात आम्ही तीव्र आंदोलनं केली. सरकारशी, राज्यपालांशी पाठपुरावा केला. ह्या रेट्यानंतर वीज कंपनीचे मालक अदानी श्री. शरद पवार साहेबांच्या घरी येऊन जातात. त्यानंतर ‘नागरिकांना वाढीव वीजबिल भरावे’ अशी सरकार भूमिका घेतं. हे सरकार वीज कंपन्यांना पाठीशी घालतंय.
- लॉकडाऊनमध्ये वीज कंपन्यांना नफा झाला नाही म्हणून तुम्ही नागरिकांना पिळणार असाल, छळणार असाल तर जनतेने का सहन करायचं?
- लोकांसाठी नाही तर एकमेकांना शह-काटशह देण्यासाठी राज्यात सध्या इतर राजकीय पक्षांची आंदोलनं सुरु आहेत. भाजपने इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यापेक्षा केंद्राशी बोलावं ना? तुमचंच सरकार आहे ना!
- एखाद्या सरकारच्या धोरणासाठी भारत सरकारने भारतरत्नांची प्रतिष्ठा पणाला लावू नये. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर ही माणसं दिग्गज आहेत पण साधी आहेत. आपल्या भारत सरकारने सांगितलं म्हणून त्यांनी ट्विट केलं पण आज सर्व रोषाला त्यांनाच सामोरं जावं लागतंय.सरकारने अशी घोडचूक पुन्हा करू नये.
- रिहानाने एक ट्विट केलं तर सर्व आगपाखड करतायत आणि म्हणतायत कि आमच्या देशाचा प्रश्न तू नाक खुपसू नको मग ‘अगली बार ट्रम्प सरकार’ म्हणत जाऊन भाषणंही करायची गरज नव्हती, तोही त्यांच्या देशाचा प्रश्न होता.
- भाजप आणि शिवसेनेची ज्यावेळेस केंद्रात-राज्यात सत्ता होती तेव्हा देशातल्या अनेक शहरांची, दिल्लीतल्या रस्त्यांची नावं बदलली गेली. पण औरंगाबादचं संभाजीनगर का नाही झालं? ह्याचं उत्तर भाजप-शिवसेनेने द्यावं. तिथले नागरिक हे सर्व पाहत आहेत ह्यांचा योग्य तो समाचार ते घेतील.
- पुण्यात शर्जील उस्मानीला तिथेच चोपायला पाहिजे होतं. पण मला प्रश्न पडतो की, त्याला कुणी हे बोलायला लावलंय का? कारण सध्या राज्यात अशाच पद्धतीचं राजकारण सुरु आहे. कुणाला तरी बोलायला लावायचं आणि त्यावर मग राजकारण करायचं.