मुंबई – राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे माजी सरचिटणीस आणि कामगार नेते र. ग. कर्णिक यांचं आज वृद्धापकाळानं वांद्रे येथील निवासस्थानी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. कर्णिक यांनी ५२ वर्षे सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे सरचिटणीस म्हणून काम पाहिलं होतं.
१९७० आणि १९७७ मध्ये कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली सरकारी कर्मचाऱ्यांचे दोन मोठे संप झाले होते. सरकारी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्नही मार्गी लावण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. कर्णिक यांच्या निधनामुळं कामगारांचा आधार हरवल्याची भावना व्यक्त होत आहे.
कर्णिक यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. कामगार चळवळीत न्याय हक्कांसाठी लढतानाही सामाजिक भान राखणं महत्वाचे असतं, अशा संवेदनशीलतेचा धडा घालून देणारा नेता हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्णिक यांना श्रद्धांजली वाहिली आहे.