मुंबई – विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होत असून, अधिवेशनात दोन दिवस कामकाज होणार आहे.
विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. विरोधक आणि सरकार यांच्याकडून विविध प्रश्नांवर आरोपांच्या फैरी झाडण्यात आल्या आहेत. त्यामुळे अधिवेशन गाजण्याची चिन्हे आहेत. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन होणार आहे.
विरोधकांकडून जोरदार टीका
केवळ २ दिवसाचे अधिवेशन आयोजित करुन सरकार काय साध्य करु इच्छित आहे, असा सवाल विरोधकांनी विचारला आहे. चर्चेपासून पळ काढण्यासाठीच सरकार असा उद्योग करीत असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. राज्यात अनेक प्रश्न अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचे असून त्यावर चर्चा केव्हा करायची, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
कोरोना चाचणी बंधनकारक
हिवाळी अधिवेशनासाठी सर्वांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यासाठी दि १२ आणि १३ डिसेंबर रोजी विधानभवन परिसरात तपासणी शिबीर घेण्यात आले. अधिवेशनासाठी येणाऱ्या राज्यातील दोन्ही सभागृहातील आमदारांसह विधानभवन आणि मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस आणि पत्रकार यांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन
सामाजिक अंतराचे पालन करण्यासाठी सदस्यांची बसण्याची व्यवस्था पावसाळी अधिवेशनाप्रमाणे करण्यात येणार आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रत्येक सदस्याला सुरक्षा किट देण्यात आले आहे. या किटमध्ये फेस शील्ड, मास्क, हॅण्ड ग्लोव्हज, सॅनिटायझर आदी वस्तूंचा समावेश आहे. आमदारांच्या स्वीय सहायकांना विधानमंडळात प्रवेश दिला जाणार नाही. मात्र, स्वीय सहायकांची आणि वाहनचालकांची बसण्याची तसेच अल्पोपहार आदी व्यवस्था विधानमंडळ परिसरात तंबू टाकून करण्यात आली आहे.