मुंबई – केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई)ने मे महिन्यात परीक्षा घेण्याची घोषणा केल्यानंतर आता राज्यातील माध्यमिक बोर्डाच्या परीक्षाही लांबणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य बोर्डाच्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा सर्वसाधारणपणे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये घेतल्या जातात. मात्र, कोरोनामुळे आता या परीक्षा जवळपास २ महिने उशीराने होणार आहेत. इयत्ता १२वीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर तसेच इयत्ता १०वीच्या परीक्षा १ मे नंतर घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहिर केले जाणार असून शिक्षक, शाळा, विद्यार्थी व पालकांना त्यादृष्टीने नियोजन करता येईल, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.