मुंबई- शैक्षणिक, सेवा, निवडणूक, इतर कारणांकरिता २०२०-२१ या वर्षात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. अशा विद्यार्थी व अर्जदारांचे नुकसान होऊ नये म्हणून पुणे येथील बार्टी कार्यालयाने सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना १५ मार्च, २०२१ ते ३० मार्च २०२१ या कालावधीत विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या विशेष मोहिमेअंतर्गत समितीकडील सहा महिन्यांवरील सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याच्या व ज्या प्रकरणांत त्रुटी आहेत, त्याबाबत संबंधित विद्यार्थी व अर्जदारास त्यांच्या प्रकरणांतील त्रुटींची पूर्तता करुन घेण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत.
तरी ज्या विद्यार्थी व अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्र त्रुटी अभावी प्राप्त झालेले नाही, त्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी संबंधित जिल्हा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी त्रुटी पूर्तता करण्यासाठी आवश्यक पुरावे व मूळ कागदपत्रांसह संपर्क साधावा, असे आवाहन मुख्य समन्वयक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.