प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती
मुंबई ः नवीन सौरऊर्जा धोरण निश्चित करण्यासाठी, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांच्या नेतृत्वाखाली उच्च स्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. हे धोरण ठरवण्यासाठी गुजरात आणि राजस्थान मॉडेल्सचा अभ्यास करण्यात येणार आहे.
राज्यात सौरऊर्जा प्रकल्प मोठया प्रमाणावर राबवण्यासाठी, इंडो-फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्ससोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राऊत यांनी आज मंत्रालयातून संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. या अनुषंगाने, हरित योजनेअंतर्गत शासनाकडून पडीक जागा विकत घेऊन सौर ऊर्जा प्रकल्प उभे करण्यासाठी, खाजगी गुंतवणूकदारांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता करण्यासाठी, एक खिडकी यंत्रणा राबवण्यात येईल, असे राऊत यांनी या बैठकीत सांगितले. राज्यात वसुंधरा आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी, पारंपरिक ऊर्जेवरची राज्याची निर्भरता कमी करुन, राज्यात सौर ऊर्जेवर आधारित अपारंपरिक ऊर्जानिर्मिती करण्यावर अधिक भर दिला जाईल, अशी घोषणाही राऊत यांनी केली आहे.