मुंबई – राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा फैलाव वाढत असून रुग्णांची आकडेवारी देखील दिवसागणिक वाढतच आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाची चिंता वाढली असून काही शहरांमध्ये लॉकडाऊन करावा लागण्याची शक्यता आहे. आज मंगळवारी (२३ मार्च ) या मुद्द्यावर आरोग्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. राज्यात कडक निर्बंध लावायचे किंवा लॉकडाउनचा निर्णय याबाबत चर्चा होऊ शकते. याकरिता कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.
सदर बैठकीत कोरोनाचा सामना करण्यासाठी पुढची रणनीती आखली जाऊ शकते. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे की, कोरोनाचे रुग्ण वाढत असतील तर लॉकडाऊन टाळायचे असेल तर कोरोनासंबंधीच्या नियामांचे पालन नागरिकांना करावे लागेल.
सार्वजनिक ठिकाणी होणार गर्दी, नागरिकांचा बेजबाबदारपणा यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. कोरोना रुग्णवाढ न थांबल्यास राज्यातील काही शहरांमध्ये लॉकडाऊन केला जाऊ शकतो, अशी शक्यता देखील राजेश टोपे यांनी व्यक्त केली होती.
दरम्यान, कोरोना बाधित रुग्णसंख्ये मुंबई, पुणे, नागपूरची आकडेवारी चिंताजनक असून राज्यात सध्या २ लाख १० हजार सक्रिय रुग्ण असून ८५ टक्के लक्षण विरहित आहेत. तर कोरोनामुळे होणारा मृत्यूदर ०.४ टक्के इतका आहे. केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन आणि अंमलबजावणी राज्यात होत असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले.
सध्या पुरेशा प्रमाणात बेड उपलब्ध आहेत. मात्र, वाढती संख्या लक्षात घेता आणखी तयारी करावी लागणार आहे, राज्यात काल २४ हजार ६४५ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आणि नवीन १९ हजार ४६३ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले. राज्यात एकूण २ लाख १५ हजार २४१ सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८९.२२ टक्के झाले असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे.