नंदुरबार – जिल्ह्यातील पहिली ते चौथीच्या 1506 शाळांपैकी 1430 शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शहरी भागातील 76 शाळा सुरू करण्यात आलेल्या नाहीत. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिलेल्या निर्देशाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. राज्यात प्रथमत प्राथमिकच्या शाळा सुरू झाल्या आहेत.
अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा आणि नवापूरचा शहरी भाग वगळता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शिक्षण विभागाने कोरोनाविषयक आवश्यक खबरदारी घेऊन शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली आहे.
नंदुरबार तालुक्यात 14 केंद्रातील 190, नवापूर 19 केंद्रातील 254, शहादा 18 केंद्रातील 242, तळोदा 9 केंद्रातील 132, अक्कलकुवा 19 केंद्रातील 323 आणि धडगाव तालुक्यात 14 केंद्रातील 289 शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.
नंदुरबार तालुक्यातील 12 आणि शहादा तालुक्यातील 29 शाळा कोरोनाचा संसर्ग अधिक असलेल्या भागात असल्याने सुरू करण्यात आलेल्या नाहीत. नवापूरच्या शहरीभागातील 16 आणि तळोद्याच्या शहरी भागातील 19 शाळादेखील सुरू करण्यात आलेल्या नाहीत, अशी माहिती शिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी यांनी दिली आहे.
शाळा सुरू झाल्यानंतर कोरोनाविषयक सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांची भेट घेऊन त्यांना आवाहन करण्यात येत आहे.