नवी दिल्ली – गुजरात, मुंबईसह कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात गुरुवारी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्र व गुजरात मध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. दक्षिण पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगढ आणि गंगा खोऱ्यातील पश्चिम बंगालचा भाग या ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मध्यम ते तीव्र पाऊस पडेल, असा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.
भारतीय हवामानखात्याच्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्र तसेच प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर ओडिशा आणि नजीकच्या गंगा खोऱ्यातील पश्चिम बंगालवरील कमी-दाबाचे क्षेत्र तसेच संबंधित चक्रवात नैऋत्येकडे सरकला आहे. तो आगामी २ दिवसांत वायव्येकडे सरकून त्याचा जोर हळूहळू ओसरेल. दक्षिण गुजरातवरुन चक्रवाती अभिसरणापर्यंत मध्यम आणि उच्च उष्णकटिबंधीय स्तरावर कमी-दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ५०-६० किमी प्रती तास अशा जोरदार पश्चिमी वाऱ्यांमुळे, पश्चिम किनारपट्टीवर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणखी २ दिवस राहणार आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे.