मुंबई – माहिती तंत्रज्ञानाने जग व्यापल असताना ऑनलाईन माहितीची देवाण घेवाण, आर्थिक व्यवहार होतात. अनेक जिल्ह्यात आर्थिक व्यवहारांमध्ये फसवणूक होताना दिसते. दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यात वाढ होत आहे. त्यांचे प्रमाण इतर गुन्ह्यांएवढे वाढत आहे. पाच ट्रिलियन डॉलरने सायबर गुन्हे जगभरात वाढत आहेत. महाराष्ट्रातही हे प्रमाण आणि प्रकार वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी सायबर पोलीस स्टेशन सुरु करण्यात आल्याचा आनंद आहे. ९०० कोटींचा सायबर क्राईम सिक्युरिटी प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर सुरु करू. यामाध्यमातून सायबर क्राईम थांबवण्याचा प्रयत्न होणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाण्याचे प्रत्यक्षात उद्घाटन केले तर पूर्व, पश्चिम, उत्तर दक्षिण आणि मध्य विभाग सायबर पोलीस ठाण्याचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन केले. याच कार्यक्रमात ९४ पोलीस ठाण्यातील स्वागत कक्षाचे ऑनलाईन उद्घाटनही करण्यात आले. याप्रसंगी गृहमंत्री बोलत होते.
गृहमंत्री म्हणाले की, समाज माध्यमाचा वापर करून पोलिसांना, राजकीय व्यक्ती किंवा महिलांना बदनाम करण्याचे काम, अफवा पसरवण्याचे, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले जात असल्याचे दिसते. अशा घटना थांबवण्यासाठीही या ठाण्यांचा उपयोग होईल. फेक प्रोफाईल तयार करण्याचे प्रमाण ही खूप वाढले आहे त्याकडे लक्ष देता येईल. मुंबईत कायदा व सुव्यवस्था चांगली राहावी, गुन्ह्यांचे प्रमाण कमी व्हावे हा महत्त्वाचा विषय घेऊन महाराष्ट्र मुंबई पोलीस दल काम करत आहे. पोलिसांसाठी घरे हा महत्त्वाचा विषय आहे, एक लाख घरे पोलिसांसाठी बांधता येतील. हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे ते म्हणाले. जो कुणी नियमाच्या बाहेर जाऊन काम करील त्यांना धडा शिकवण्याचे काम मुंबई पोलीस करतच राहील असेही गृहमंत्री यावेळी म्हणाले. अँटी नार्कोटिक सेल अधिक सक्षम करण्याची गरज आहे, त्याचा प्रस्ताव तयार करून सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये स्वागत कक्ष निर्माण करून मार्गदर्शन करणार असल्याबद्दल मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख यांनी पोलिसांचे अभिनंदन केले. पोलीस स्टेशनला फक्त गुन्हा घडल्यावरच लोक येत नाही. त्यांच्या काही अडचणी प्रश्न असतात, त्यांना बसून सांगता येईल अशी जागा नव्हती. स्वागत कक्षामुळे हा प्रश्न सुटल्याचे ते म्हणाले जगभरात मुंबई पोलिसांचे नाव उंचावत ठेवण्यासाठी चे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले. शासन आपल्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देशमुख यांनी दिली.