मुंबई – भारतातील गीर गाईचा गोवंश वाढवून ब्राझीलने धवलक्रांती घडवून आणली. ब्राझीलमध्ये ही जात आज सर्वोच्च उत्पादन देणारी बनली आहे. याच धर्तीवर राज्यात 12 लीटर दूध देणारी सानेन शेळी आणून त्यावर संशोधन करून क्रांतिकारी वाटचाल करण्याचा मानस असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.
मंत्रालयात अॅग्रोवर्ल्ड फार्मच्या ‘दूध विशेषांका’चे प्रकाशन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अॅग्रोवर्ल्ड फार्मचे संपादक शैलेंद्र चव्हाण, पुणे विभागाच्या प्रमुख वंदना कोर्टीकर यांची उपस्थिती होती.
दुग्ध व्यवसाय विकास मंत्री श्री.केदार म्हणाले, दुग्ध उत्पादनात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. आणखी उत्पादन वाढविण्यासाठी शासन नवनवीन प्रयोग करत आहे. यासाठी शेळी संवर्धनावर भर देण्यात येत आहे. कॅनडामध्ये सानेन नावाच्या शेळीची एक नवीन विकसित जात आहे. ही शेळी दिवसाला १२ लिटर दूध देते. अशी शेळी जर राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिली तर आपल्या शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलून जाईल. याकरीता राज्यात काही भागात लवकरच हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे श्री. केदार यांनी सांगितले.
अॅग्रोवर्ल्ड फार्मचा दूध विशेषांक दर्जेदार असून शेतकऱ्यांना वाचनीय व संग्रही ठेवण्यासारखा आहे. अॅग्रोवर्ल्ड शेतकऱ्यांसाठी राबवित असलेल्या विविध उपक्रमांचीही माहिती घेऊन त्यांनी अॅग्रोवर्ल्ड समुहाचे कौतुक केले. अॅग्रोवर्ल्डच्या माध्यमातून जळगाव येथे १२ ते १५ मार्च २०२१ या कालावधीत कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे, यासाठी शुभेच्छा दिल्या आणि कृषी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी येणार असल्याचे श्री. केदार यांनी सांगितले.